Pimpri: वृक्षलागवडीपेक्षा वृक्षसंवर्धनाकडे लक्ष द्या; स्थायीत उद्यान विभागाला घेतले फैलावर

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या उद्यान विभागामार्फत दरवर्षी पावसाळ्यापूर्वी वृक्षारोपण केले जाते. मोठ्या धामधुमीत गाजावाजा करत वृक्षरोपणाची सुरुवात केली जाते. खड्डे खोदले जातात, पुरवठादाराकडून रोपे, लालमाती खरेदी केली जाते. यावर लाखो रुपयांचा खर्च केला जातो. मात्र, त्याची फलनिष्पती नसते. गेल्या वर्षभरात किती वृक्ष लावले? त्यापैकी किती जगले ? किती मेले ? अशी माहिती स्थायीचे सदस्य विलास मडिगेरी यांनी विचारली. त्यावर उद्यान विभागाने अंदाजे नव्वद टक्के असे उत्तर दिले. त्यावर टक्केवारी नको आकडेवारी द्या, असे मडिगेरी यांनी सुनावले. तसेच वृक्षलागवडीपेक्षा वृक्षसंवर्धनाकडे लक्ष द्या. वृक्षांवर मनापासून प्रेम करा असेही ते म्हणाले.

महापालिकेच्या मंगळवारी (दि.22) झालेल्या स्थायी समितीच्या विषयपत्रिकेवर वृक्षसंवर्धन समितीच्या 2019-20 या आर्थिक वर्षाचा 28 कोटी 67 लाख 16 हजार रूपयांचा अर्थसंकल्प मंजुरीसाठी ठेवला होता. उद्यान विभागावर झालेल्या चर्चेत सदस्य विलास मडिगेरी यांनी प्रशासनास धारेवर धरले.

शहरात दरवर्षी उद्यानविभागातर्फे वृक्षलागवड करतो. त्यापैकी किती झाडे जगतात, याविषयी मडिगेरी यांनी उद्यान विभागाच्या अधिका-यांकडून माहिती मागविली. त्यावर नव्वद टक्के असे उत्तर प्रशासनाने दिले. त्यावर टक्केवारी नको आकडेवारी द्या, असे मडिगेरी यांनी सुनावले. विलास मडिगेरी म्हणाले, “महापालिकेच्या उद्यान विभागाच्या वतीने दरवर्षी पन्नास हजार झाडे लावतात. मात्र, वृक्षांच्या संवर्धनाकडे महापालिका लक्ष देत नाही. त्यामुळे वृक्षलागवडीपेक्षा वृक्षसंवर्धनाकडे लक्ष द्यायला हवे. वृक्षांबाबत प्रेम उद्यान विभाग किंवा प्रशासनास नाही, फक्त वृक्षारोपण करण्यातच रस आहे”

पुढील बैठकीत वृक्षलागवड आणि वृक्षसंवर्धनाबाबतची प्रभागनिहाय माहिती महापालिकेने द्यावी. स्थायी समितीला प्रशासन जोपर्यंत वृक्षांविषयी सविस्तर आकडेवारीसह माहिती देत नाही. तोपर्यंत उद्यान विभागाच्या अर्थसंकल्पाला मान्यता दिली जाणार नसल्याचेही, त्यांनी सांगितले.

वृक्षगणनेची माहिती उपलब्ध नाही

जीआयएस वृक्षगणनेसाठी महापालिकेने सुमारे साडेसहा कोटींच्या खर्चास गेल्यावर्षी मंजुरी दिली आहे. जीआयएसच्या माध्यमातून वृक्षगणनेचे काम किती झाले आहे, असे प्रशासनास विचारले असता त्यांना उत्तर देता आले नसल्याचे, मडिगेरी यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.