Pimpri: सामाजिक संस्थाकडून भरघोस मदत; पण सरकारी मदत कधी ?

एमपीसी न्यूज – कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत गोरगरीब नागरिकांसाठी आजमितीला खासगी संस्था, संघटना मोठ्या प्रमाणात  मदत करत आहेत. परंतु, या संघटना किती दिवस मदत करतील, त्यांच्या आशेवर किती दिवस राहणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. सरकारने तीन महिन्यांचे धान्य एकाच वेळी देण्याचा निर्णय घेतला असला तरी अद्याप शहरात त्याची  ठोसपणे अमंलबजावणी झाली नसल्याचे दिसून येते. त्यामुळे सरकारी यंत्रणेची मदत कधी मिळणार, असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यामुळे नागरिक घरी असून, त्यांच्या हातचा रोजगार गेला आहे. कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे काही  नागरिकांवर उपजिवीकेचा प्रश्न उद्भवला असल्याने त्यांच्यावर उपाशी राहण्याची वेळ आली आहे. यामध्ये वृध्द, दिव्यांग, अनाथ, निराधार, बेवारस यांच्यासह काही विद्यार्थी, कामगार, रोजंदारीवर काम करणारे व्यक्ती आदींचा समावेश आहे.

या सर्वांना सध्याच्या आपत्कालीन परिस्थितीत अन्न आणि शिधा पुरविण्यासंदर्भात विविध स्वयंसेवी संस्था आणि व्यक्ती पुढे सरसावल्या आहेत. त्यांच्याकडून भरघोस मदत केली जात आहे. त्यामुळे त्यांचे  कौतुक देखील होत आहे. परंतु, या संघटना, संस्था किती दिवस मदत करतील. त्यांच्या मदतीवर किती दिवस अवंलबून रहायचे, हा प्रश्न विचारला जात आहे.

नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून सरकारने तीन महिन्यांचे धान्य एकाच वेळी देण्याचा निर्णय घेतला. स्वस्त धान्य दुकानातून एकाच वेळी तीन महिन्यांच्या धान्याचे वितरण करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. परंतु, त्याची अंमलबजावणी होत असल्याचे दिसून येत नाही. अन्नधान्याच्या मदतीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निर्णय घेतला जातो, असे महापालिकेने स्पष्ट केले आहे. दरम्यान, आकुर्डी तहसील कार्यालयातील तहसीलदारांशी यासंदर्भात संपर्क साधला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

महापालिका सामाजिक संघटनांकडून मदत घेऊन गोरगरीब नागरिकांना देत आहेत. परंतु, महापालिका अन्नधान्याची मदत करत नाही. ज्या नागरिकांना घर नाही. राहण्याची सोय नाही. परराज्यातून शहरात आलेले आणि अडकलेल्या नागरिकांसाठी महापालिकेतर्फे राहण्याची सोय केली आहे. त्यांच्यासाठी 11 सेल्टर निर्माण केले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.