Pimpri: भाजप-शिवसेनेच्या मुख्यमंत्रीपदासाठी यात्रा; डॉ. अमोल कोल्हे यांची टीका

मंगळवापासून राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा काढणार

एमपीसी न्यूज – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा आणि शिवसेनेचे युवानेते आदित्य ठाकरे यांची जनआशीर्वाद यात्रा सुरू आहे. या दोन्ही यात्रा मुख्यमंत्रीपदासाठी सुरु केली आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आज (गुरुवारी) केली. शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या किल्ले शिवनेरीवरुन राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा सहा ऑगस्टपासून सुरु होणार आहे. ही यात्रा महाराजांच्या साध्या मावळ्याची असणार आहे. त्यामुळे भाजप-शिवसेनेच्या यात्रेशी याची तुलना करु नये, असेही ते म्हणाले.

आगामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राज्यात विविध राजकीय पक्षांच्या यात्रा सुरू झाल्या आहेत. शिवसेनेचे युवानेते आदित्य ठाकरे यांची जनआशीर्वाद यात्रा सुरू असून त्याच्या दुस-या टप्प्याला सुरुवात झाली आहे. तर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आजपासून महाजनादेश यात्रा सुरू झाली आहे.

  • याबाबत विचारले असता डॉ. कोल्हे म्हणाले, भाजप-शिवसेनेची यात्रा मुख्यमंत्रीपदासाठीची यात्रा आहे. राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा सहा ऑगस्टपासून सुरु होणार आहे. शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या किल्ले शिवनेरीवरुन यात्रेला सुरुवात होणार आहे. राज्यात वादळ घोंघावणार आहे.

सरकारला वेगळ्या सत्तेची मस्ती!
राज्यातील गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच गृहमंत्रालय आहे. त्यांच्या नागपूर शहरातील गुन्हेगारी ऐरणीवर आली आहे. लोक मारले जात आहेत. अनेक जीव गेले तरी सरकार जनतेचा आवाज ऐकत नाही. राज्याला पूर्णवेळ गृहमंत्र्यांची आवश्यकता आहे. त्याची पाच वर्षांपासून मागणी होत आहे. परंतु, स्वतंत्र गृहमंत्री दिला जात नाही. ही वेगळ्या सत्तेची मस्ती नाही का? असा संतप्त सवालही डॉ. कोल्हे यांनी उपस्थित केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.