Pimpri : जलतरण तलाव, बांधकामांचा पाणीपुरवठा बंद करा

नगरसेवक प्रा. उत्तम केंदळे यांची महानगरपालिका आयुक्तांकडे मागणी

एमपीसी – पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणा-या पवना धरणातील पाणी पातळी खालावत आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने पाणीकपात करून शहराला दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची घोषणा केली आहे परंतु, पाणी टंचाईवर मात करण्यासाठी तातडीने पिंपरी-चिंचवड शहरात जलतरण तलाव, बांधकामे आणि वॉशिंग सेंटर यांना पुरविला जाणारा पाणीपुरवठा बंद करावा, अशी मागणी भाजप नगरसेवक प्रा. उत्तम केंदळे यांनी केली आहे.

नगरसेवक प्रा. उत्तम केंदळे यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त व पाणीपुरवठा विभागाचे सहशहर अभियंता यांना निवेदन दिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणात पाण्याची पातळी खालावली असल्यामुळे शहरात ६ मे पासून एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.

  • पवना धरणात २९ टक्के साठा राहीला आहे. हा साठा ३० जूनपर्यंत पुरेसा ठरणार आहे. पावसाळा लांबणीवर पडणार आहे याचा अंदाज घेऊन ही पाणी कपात करण्यात येत आहे. त्यातून २५ टक्के पाणी बचत होऊन धरणातील पाणीसाठा १५ जूलैपर्यंत पुरेल. परंतु, पाऊस लांबणीवर जाण्याची शक्यता वर्तविली गेलेली आहे. त्यामुळे येते दोन महिने पाणीटंचाईच्या दृष्टीने कठीण आहेत. त्यामुळे टंचाईवर मात करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने उपाययोजना करणे गरजेचे आहे. महापालिकेच्या वतीने नेहरूनगर, भोसरी, थेरगाव, केशवनगर, मोहननगर, पिंपळे गुरव, सांगवी, कासारवाडी, यमुनानगर, संभाजीनगर, पिंपरी गाव, प्राधिकरण-निगडी असे तेरा जलतरण तलाव सुरू आहेत. सर्वच तलावांवरील बोअरिंग बंद असल्याने पिण्याचे पाणी वापरले जात असल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. उन्हाळी सुट्ट्यामुळे मुले, तरूण व नागरिक त्याचा लाभ घेतात. तेथील टॅक, शॉवर, नळ व स्वच्छतागृहातही पिण्याचे पाणी वापरले जाते. त्यामुळे दररोज लाखो लिटर पाणी या तरण तलावांमध्ये खर्ची पडत आहे.

त्याबरोबरोबर शहरातील मोठमोठ्या बांधकामाला केल्या जाणाऱ्या पाणी पुरवठा सुरू आहे. बिल्डर्सच्या मोठमोठ्या साईट शहराच्या विविध भागात सुरू आहेत. बहुतेक साईटला महापालिकेचाच पाणीपुरवठा असल्याचे निदर्शनास आलेले आहे. टँकरद्वारेही पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे रोज लाखो लीटर पाणी बांधकामावर खर्च होते. त्याचा विचार करता शहरातील जलतरण तलाव व बांधकामांसाठी दिले जाणारे पाणी बंद करावे.

  • तसेच, शहरात वॉशिंग सेंटर्सची संख्या मोठी आहे. वॉशिंग सेंटर्सच्या माध्यमातून रोज हजारो लिटर पाणी वापरले जाते. उन्हाळ्याचे दिवस लक्षात घेता वॉशिंग सेंटर्सचे पाणी बंद करणे गरजेचे आहे. तसेच, महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा यंत्रणेतील त्रृटीमुळेही मोठ्या प्रमाणात पाणी वाया जाते. तेही नियंत्रित करण्यासाठी तातडीने उपापयोजना राबवाव्यात, अशी मागणी नगरसेवक प्रा. उत्तम केंदळे यांनी निवदेनाव्दारे केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.