Pimpri : पादचारी महिलेची पर्स हिसकावणा-या दोन चोरट्यांना नागरिकांनी पकडले

एमपीसी न्यूज – रस्त्याने पायी जात असलेल्या महिलेची पर्स दुचाकीवरून आलेल्या तीन चोरट्यांनी हिसकावली. महिलेने आरडाओरडा केल्याने जवळपास असणाऱ्या नागरिकांनी दोन चोरट्यांना पकडले. ही घटना सोमवारी (दि. 27) रात्री साडेनऊच्या सुमारास ओपन लॉन्स शेजारी पिंपरी येथे घडली.

राहुल उत्तम इंगवले (वय 18, रा. काळेवाडी), विकी नागेश वाघमारे (वय 18, रा. काळेवाडी) अशी पकडलेल्या दोन चोरट्यांची नावे आहेत. तर साहिल उर्फ खत्री (पूर्ण नाव पत्ता माहीत नाही) असे पळून गेलेल्या चोरट्याचे नाव आहे. याप्रकरणी हिरामणी दिलीप नाथपोटाणी (वय 45, रा. पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हीरामणी सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास पिंपरी मधील ओपन लॉन्स येथून रस्त्याने पायी जात होत्या. त्यावेळी होंडा अॅक्टिवा मोपेड दुचाकीवरून आलेल्या तीन चोरट्यांनी त्यांची पर्स हिसकावली. पर्समध्ये दोन हजार पाचशे रुपये रोख रक्कम होती. चोरट्यांनी पर्स हिसकावताच हिरामणी यांनी आरडाओरडा केला. यामुळे परिसरातील नागरिकांनी मोपेड दुचाकीवरील चोरट्यांना पकडले. मात्र तिसरा चोरटा पळून गेला नागरिकांनी दोन्ही चोरट्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.