Pimpri : चिंचवड गुरुकुलम येथे उद्यापासून दोन दिवसीय जल संस्कृती कार्यशाळा

एमपीसी न्यूज – चिंचवड येथील पुनरुत्थान समरसता गुरुकुलम येथे २० आणि २१ मे रोजी जल संस्कृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. दिल्ली येथील दीनदयाळ शोध संस्थान आणि इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर आर्टस् यांच्या पुढाकाराने सुरु असणाऱ्या जल संस्कृती संकलनाच्या कार्याला महाराष्ट्रात चालना देण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती मयुरेश प्रभुणे यांनी दिली.

मोसमी पावसातील चढ – उतारांवर उपाय म्हणून देशातील विविध प्रदेशांत जल संधारणाच्या विविध पद्धती विकसित झाल्या. प्रत्येक प्रदेशाच्या भौगोलिक, हवामानशास्त्रीय, तसेच सांस्कृतिक, सामाजिक घटकांचा या जल संधारणावर प्रभाव दिसून येतो. पाण्याला मध्यवर्ती स्थान देऊनच भारतीय संस्कृती विकसित झालेली आहे. देशाच्या या जल संस्कृतीचे दर्शन पाण्याची साठवण करणाऱ्या किंवा जल स्रोतांभोवतीच्या वास्तूरचना,लोकवाङ्मय, लोकगीते, संत साहित्य, म्हणी, विविध कला प्रकार आदींमधून घडत असते.

  • सर्वसामान्यांच्या प्रत्यक्ष अनुभवातून शेकडो वर्षांमध्ये विकसित झालेले हे ज्ञान आधुनिक काळात मात्र लोप पावत आहे. भारताच्या जल संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या या ज्ञानाचे देशाच्या विविध भागांमधून संकलन करून कायम स्वरूपी जतन करण्यासाठी दीनदयाळ शोध संस्थान आणि इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर आर्टस् यांच्या पुढाकाराने राष्ट्रीय प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.

या प्रकल्पांतर्गत देशाच्या विविध भागांतील पारंपरिक ज्ञानाच्या संकलनाला चालना देण्यासाठी देशाच्या विविध भागांमध्ये जल संस्कृती कार्यशाळांचे आयोजन करण्यात येत आहे. आतापर्यंत राजस्थान, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशांत जल संस्कृती कार्यशाळा पार पडल्या आहेत.

  • महाराष्ट्रातील जल संस्कृती कार्यशाळा येत्या २० आणि २१ मे रोजी चिंचवड येथील पुनरुत्थान समरसता गुरुकुलम येथे आयोजित करण्यात आली आहे. या जल संस्कृती कार्यशाळेत पाणी आणि पारंपरिक ज्ञान या विषयांत कार्यरत असणाऱ्या तज्ज्ञांचा आणि कार्यकर्त्यांचा सहभाग राहणार असून, त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जल संस्कृती संकलनाच्या कार्याची दिशा निश्चित करण्यात येणार आहे.

कार्यशाळेत पाणी आणि निसर्गासंबंधी पारंपरिक गीते, ओव्या गाणाऱ्या ग्रामीण भागांतील महिला, निसर्गाविषयीची विविध कौशल्ये, ज्ञान आत्मसात असणारे भटके- विमुक्त समाजातील कार्यकर्ते यांचे सादरीकरणही होणार आहे.

  • जल संस्कृती कार्यशाळेला हवामान आणि कृषीतज्ज्ञ प्रा. एम. सी. वार्ष्णेय, अभय महाजन, गोपाल आर्य, गिरीश प्रभुणे, अभिजित घोरपडे, संतोष शुक्ल, उद्धव नेरकर आदींचे मार्गदर्शन लाभणार आहे. पाणी आणि पारंपरिक ज्ञान या विषयांत काम करणारे कार्यकर्ते, संस्था या कार्यशाळेत सहभागी होऊ शकतात.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.