Pimpri : दोन उपअभियंता, लिपिकाची वेतनवाढ रोखली

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बेशिस्त वर्तन करणा-या दोन उपअभियंता आणि एका लिपिकाची वेतनवाढ रोखण्यात आली आहे. पुन्हा कामात कसूर केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. तर, एका रखवालदाराला सक्तीची सेवानिवृत्ती देण्यात आली आहे. आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी ही कारवाई केली.

किशोर महाजन व विजयकुमार काळे अशी उपअभियंत्यांची नावे आहेत. तर, मारूती भोंग असे लिपिकाचे नाव आहे. आपत्कालीन परिस्थितीच्या कामात बेफिकीरी, अनास्था व हलगर्जीपणा केल्यामुळे या उपअभियंत्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. ती कारवाई रद्द करून त्यांची प्रत्येकी एक वेतनवाढ रोखण्याचा निर्णय महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी घेतला आहे.

यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील लिपिक भांगे यांनी भरण पावत्या रद्द करून शासकीय पैशांचा अपहार केला होता. त्यामुळे भांगे यांचे सेवानिलंबन करून त्यांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले होते. अपहार केलेल्या 3 लाख 60 हजार 801 रुपयांचा भरणा लिपिक भांगे यांनी महापालिका कोषागारात केला आहे. त्यामुळे त्यांची दोन वेतनवाढ रोखण्याचे आदेश आयुक्त हर्डीकर यांनी दिले आहेत. तसेच निलंबन कालावधीत वेतन अदा केले जाणार नाही. यापुढे पुन्हा चूक केल्यास अधिक दंड करण्याचा इशारा आयुक्तांनी दिला आहे.

दरम्यान, विनापरवाना गैरहजर राहणा-या रखवालदाराला सक्तीची सेवानिवृत्ती करण्याचे आदेश महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले आहेत. राजेश राजोरिया असे या रखवालदाराचे नाव आहे. राजोरिया हा रखवालदार 907 दिवस विनापरवाना गैरहजर राहीला होता. त्यामुळे त्याला सक्तीची सेवानिवृत्ती दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.