Pimpri: शहरात पाच दिवसात दोन हजार रुग्णांची नोंद; रुग्णसंख्या 8 हजार पार

Two thousand patients registered in five days in the city; The number of patients crossed 8 thousand : आज 379 नवीन रुग्णांची भर

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मागील पाच दिवसांत म्हणजेच 9 ते 14 जुलै दरम्यान शहरात तब्बल दोन हजार नवीन रुग्णांची वाढ झाली आहे. आज (मंगळवारी) सायंकाळी पाच वाजेपर्यंत 379 नवीन रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे शहरातील आजपर्यंतची रुग्ण संख्या 8059 झाली आहे. 10 मार्च ते 14 जुलै या 137 दिवसात औद्योगिकनगरीतील रुग्णसंख्या आठ हजाराच्या पुढे गेली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने होत आहे. मागील काही दिवसांपासून दररोज रुग्ण सापडण्याचा उच्चांक होत आहेत. शहराच्या नवीन भागात रुग्ण सापडत आहेत. शहराच्या सर्वच भागात कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत.

दिवसाला चारशे, पाचशे जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह येत आहेत. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आजपासून दहा दिवसांसाठी लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. लॉकडाउन कालावधीत साखळी तुटते का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

9 जुलै पर्यंत शहरातील रुग्णसंख्या सहा हजार होती. त्यानंतर 9 ते 14 जुलै या अवघ्या पाच दिवसात तब्बल दोन हजार नवीन रुग्णांची वाढ झाली आहे. आत्तापर्यंत औद्योगिकनगरीतील रुग्ण संख्या 8059 वर पोहोचली आहे.

आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत तब्बल 379 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे औद्योगिकनगरीतील रुग्णसंख्या आठ हजार पार झाली आहे.

4875 रुग्णांची कोरोनावर यशस्वी मात, 3055 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु

शहरातील रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यात दिलासादायक बाब म्हणजे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण मोठे आहे. सक्रिय रुग्णांपेक्षा रुग्ण बरे होण्याची संख्या जास्त आहे. आजपर्यंत 4875 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

आजमितीला 3055 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यापैकी तब्बल 2366 रुग्णांमध्ये कोरोनाची काहीच लक्षणे नाहीत. केवळ त्यांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आहे. तर, 446 रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे असून 69 रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. तर, आजपर्यंत शहरातील 129 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.