Pimpri : समाविष्ट गावांचा टॅक्स माफ करणारे ‘विलास लांडे’च अनधिकृत बांधकामे, शास्तीकराचा प्रश्न सोडवू शकतात- प्रवीण भालेकर

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेने समाविष्ट गावांना चुकीच्या पद्धतीने आकारणी केलेले मिळकतकर माजी आमदार विलास लांडे यांनी सरकारकडून माफ करून आणले. ही रक्कम ७२ कोटी रुपये आहे. सामान्यांचा करमाफ करून आणणारे विलास लांडे हे शहरातील एकमेव आमदार आहेत. मात्र, त्यांनी त्याचे कधी मार्केटिंग केले नाही. राजकीय लाभ उठविला नाही. करमाफी करून आणणारा विलास लांडे यांच्यासारखा नेताच अनधिकृत बांधकामे, शास्तीकरासारखे प्रलंबित प्रश्न सोडवू शकतो, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे नगरसेवक प्रवीण भालेकर यांनी बुधवारी (दि. 16)  केले.

प्रवीण भालेकर म्हणाले, सत्ताधाऱ्यांनी अनधिकृत बांधकामे, शास्तीकर या प्रश्नांचे गाजर दाखविण्यापलीकडे काही काम केले आहे. प्रश्न सुटल्याचे खोटे सांगून पुन्हा मते मागायला येत आहेत. मात्र, तळवडे, रुपीनगर, त्रिवेणीनगरमधील जनतेने अनधिकृत बांधकामे, शास्तीकराचा प्रश्न सोडविण्यासाठी अपक्ष उमेदवार विलास लांडे यांना विजयी करून पुन्हा विधानसभेत पाठविण्याचा निर्धार केला आहे.

भोसरी विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार माजी आमदार विलास लांडे यांनी तळवडे, त्रिवेणीनगर, रूपीनगर व परिसरात पदयात्रा काढून प्रचार केला. त्यावेळी नगरसेवक प्रवीण भालेकर बोलत होते. विलास लांडे यांनी तळवडे गावच्या कमानीवरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आणि गावठाणातील भैरवनाथ मंदिरात दर्शन घेऊन या पदयात्रेला सुरूवात झाली.

यावेळी राष्ट्रवादीचे नगरसेवक पंकज भालेकर, नगरसेविका पौर्णिमा सोनवणे, संगीता ताम्हाणे, हभप शिवाजी नखाते, हभप रंगनाथमहाराज भालेकर, बाळासाहेब वाळुंज, मनसेचे विभागप्रमुख विशाल मानकरी, सुजाता काटे, संगीता देशमुख, अरूण थोपटे, सुधाकर दळवी, पोलिस मित्र संघटनेचे अध्यक्ष संदिप जाधव, हभप हरिभाऊ ताम्हाणे, अंकुश नखाते, तळवडे विविध कार्यकारी सोसायटी माजी चेअरमन तानाजी बाटे, कुंदन भालेकर, सुरेश चव्हाण, हिरामण नखाते, तुकाराम ऊर्फ बबडी भालेकर आदी उपस्थित होते. तळवडे गावठाण, ज्योतिबानगर, गणेशनगर, रूपीनगर, सहयोगनगर, त्रिवेणीनगर भागात पदयात्रा काढून ताम्हाणेवस्ती येथे समारोप करण्यात आला.

नगरसेवक प्रवीण भालेकर म्हणाले, “भोसरी विधानसभा मतदारसंघातील गावे महापालिकेत समाविष्ट झाल्यानंतर नागरिकांना आकारण्यात आलेले मिळकतकर अन्यायकारक होते. भोसरी मतदारसंघाचे प्रथम आमदार विलास लांडे यांनी राज्य सरकारकडून समाविष्ट गावांना आकारलेला अन्यायकारक कर माफ करून आणला. तब्बल ७२ कोटींचा मिळकतकर माफ करण्याचा निर्णय घेण्यास सरकारला त्यांनी भाग पाडले. सामान्यांसाठी असे काम करणारे लांडे हे शहरातील पहिले आमदार आहेत. या कामाचे त्यांनी कधी मार्केटिंग करून राजकीय फायदा उठविला नाही. समाविष्ट गावांतील नागरिकांना त्यांची जाण ठेवलेली आहे. हे नागरिक विलास लांडे यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत.

तळवडे, रुपीनगर, त्रिवेणीनगर या भागातील जनता अनधिकृत बांधकामे आणि शास्तीकराच्या प्रश्नाने सर्वाधिक त्रस्त झालेली आहे. नोटिसा आणि शास्तीकराच्या आकड्याने येथील नागरिकांची झोप उडाली आहे. सत्ताधाऱ्यांना त्याचे काही देणे-घेणे नाही. हे आता जनतेलाही समजले आहे. हे सत्ताधारी फक्त सोशल मीडियावर मार्केटिंग करणारे आहेत, हे जनतेने जाणले आहे.

तळवडे, त्रिवेणीनगर, रूपीनगर भागातील एकही अनधिकृत बांधकाम आणि शास्तीकराचा प्रश्न लोडविण्यासाठी विलास लांडे यांच्यासारख्या आमदाराची आता गरज आहे. लांडे हेच मिळकतकरमाफीच्या निर्णयासारखे हे दोन्ही प्रश्न सोडवू शकतात. त्यांच्यात ती धमक आहे. त्यासाठी लांडे यांनी पुन्हा आमदार म्हणून विधानसभेत जाण्याची गरज आहे. म्हणून तळवडे, रूपीनगर आणि त्रिवेणीनगर भागातील जनतेने विलास लांडे यांना विधानसभेत पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. तळवडेगाव ज्या उमेदवाराच्या पाठीशी उभा राहतो, तो निवडणुकीत नक्की निवडून येतो, असा आजपर्यंतचा इतिहास आहे. त्यामुळे या निवडणुकीत लांडे यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास प्रवीण भालेकर यांनी व्यक्त केला.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.