Pimpri: विनापरवाना 300 होर्डींग्ज हटविण्यासाठी 50 लाखांचा वाढीव खर्च

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरात केलेल्या सर्वेक्षणात आतापर्यंत एकूण 300 अनधिकृत फलक आढळले आहेत. त्यासाठी एक कोटींचा ठेका यापूर्वीच दिला आहे. मात्र, सर्वेक्षणानंतर आढळलेले 300 फलक हटविण्यासाठी येणा-या आणखीन 50 लाख रुपयांच्या वाढीव खर्चाला स्थायी समितीने मान्यता दिली.

दीड महिन्यांपूर्वी पुण्यातील जुना बाजार येथील रेल्वेच्या हद्दीतील जाहिरात फलक कोसळल्याने चार जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत फलकाचा प्रश्‍न ऐरणीवर आला होता. महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागामार्फत अवैध फलक काढण्यासाठी गणेश एंटरप्रायजेस या ठेकेदार एजन्सीला कामाचे आदेश देण्यात आले. हे कामकाज दोन वर्षासाठी दिले आहे. या कामाची निविदा एक कोटी रकमेची आहे. पुण्यात होर्डींग्ज कोसळून चार जणांचा बळी गेल्याची घटना घडल्यानंतर उद्योगनगरीतील अवैध जाहिरात फलकांचा प्रश्नही चव्हाट्यावर आला. विविध सामाजिक संघटना, नगरसेवक, पदाधिकारी यांनी अवैध फलक, होर्डीग्जवर कारवाई करण्याबाबत मागणी केली.

पोलिसांनीही कारवाई करण्याबाबत कळविले. त्यानुसार, स्ट्रक्चरवरील जाहिरात फलकांचे स्ट्रक्चरल ऑडीट करून घेण्याची कार्यवाही प्रस्तावित करण्यात आली. सध्या शहरातील अवैध फलकांची पाहणी करण्यात येत आहे. जे फलक अवैध आढळून आले ते काढून स्ट्रक्चर जप्त करण्याची कारवाई चालू आहे. आकाशचिन्ह विभागामार्फत होर्डींग्ज काढण्याची कारवाई करण्याबरोबरच अवैध फलकांचे सर्वेक्षणही सुरू होते. या सर्वेक्षणात 300 अवैध होर्डींग्ज आढळून आले आहेत. हे फलक काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च अपेक्षित आहे. निविदा काढण्यापूर्वी हे सर्वेक्षण पूर्ण झाले नसल्याने निविदा फक्त एक कोटी रूपयांची काढण्यात आली होती.

आकाशचिन्ह व परवाना विभागाकडील सन 2018-29 या आर्थिक वर्षामध्ये ‘अवैध जाहिरात फलक तथा संबंधित खर्च’ या लेखाशिर्षावर दीड कोटी रूपये इतकी तरतूद आहे. त्यापैकी 1 कोटी 29 लाख 85 हजार रूपये इतकी रक्कम शिल्लक आहे. त्यामुळे 300 फलक पाडण्यासाठी 50 लाख रूपये वाढीव खर्चास सोमवारी स्थायी समिती सभेत मंजुरी देण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.