Pimpri: रस्त्यावर जप्त केलेली बेवारस वाहने दंड आकारून सोडणार

Unauthorized vehicles seized on the road will be released with penalty charges दुचाकीसाठी 5000 रूपये, तीन चाकी वाहनांना 15 हजार रूपये तर चार चाकी आणि त्यापुढील वाहनांना 25  हजार रूपये दंडाची तरतूद

एमपीसी न्यूज – शहरात रस्ते, उड्डाणपुल अशा ठिकठिकाणी रस्त्यावर बेकायदेशीरपणे सोडून दिलेली वाहने महापालिकेमार्फत जप्त केली जातात. ही जप्त केलेली वाहने आता परत वाहन मालकांना मिळू शकणार आहेत. त्यासाठी वाहन मालकांना दंडात्मक रक्कम भरावी लागणार आहे. त्यानुसार, दुचाकींसाठी पाच हजार रूपये प्रतिवाहन, तीन चाकी वाहनांना 15 हजार रूपये प्रति वाहन आणि चार चाकी आणि त्यापुढील वाहनांना 25  हजार रूपये प्रतिवाहन प्रशासकीय शुल्क मोजावे लागणार आहे.

महापालिका हद्दीतील रस्ते, उड्डाणपुल, येथे अवैधरित्या सोडून दिलेल्या बेवारस वाहनांमुळे रहदारीस अडथळा निर्माण होतो. तसेच स्वच्छता व सुरक्षिततेसंदर्भात प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असते. या बाबी विचारात घेऊन राज्याच्या नगरविकास विभागाने 9 सप्टेंबर 2018 रोजी राज्यातील सर्व महापालिकांना मार्गदर्शक सुचना जारी केल्या होत्या. महापालिकेच्या मालमत्ता असलेल्या परिसरात तसेच रस्त्यावर बेकायदेशीरपणे सोडून दिलेल्या वाहनांची विल्हेवाट लावण्याकरिता स्थानिक परिस्थिती विचारात घेऊन आणि स्थानिक पोलिस विभागाशी चर्चा करून कालबद्ध धोरण निश्चित करावे आणि त्यानुसार कार्यवाही करावी, असेही सुचविले होते.

त्यानुसार, महापालिका, पिंपरी – चिंचवड वाहतुक शाखा आणि आरटीओ यांच्यामार्फत संयुक्तरित्या अशी वाहने जप्त करण्याची कारवाई केली जात आहे. मात्र, अशी बेवारस वाहने उचलल्यानंतर काही वाहनमालक पुन्हा तोंडी किंवा लेखी अर्जाद्वारे वाहन परत देण्याची मागणी करत आहेत. त्यामुळे कारवाईत अडथळा येत आहे.

शहरातील रस्त्यावर अतिक्रमण करून व्यवसाय करणा-या हातगाडी, टपरीधारक, पथारीवाले यांच्यावर जप्तीची कारवाई केल्यानंतर त्यांनी लेखी मागणी केल्यास महापालिका अशा अतिक्रमण धारकांकडून प्रशासकीय शुल्क वसुल करते. त्यास महापालिका स्थायी समितीचीही मान्यता आहे. अतिक्रमण करणा-या व्यावसायिकांवर कारवाई करून प्रशासकीय शुल्क वसुली करण्यासाठी महापालिका अधिनियमात तरतुद आहे.

त्याचप्रमाणे रस्त्यावर बेवारस सोडून दिलेली वाहनेही एक प्रकारचे अतिक्रमणच आहे. या वाहनांचे विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेला खर्च करावा लागतो. त्यासाठी महापालिकेने साई क्रेन सव्र्हीस आणि समीर एंटरप्रायजेस यांची नियुक्ती केली आहे. त्या अनुषंगाने 18 मार्च 2020 रोजी महापालिका अतिरिक्त आयुक्तांच्या दालनात बैठक पार पडली. त्यामध्ये अतिक्रमण निर्मुलन विभागामार्फत ज्याप्रमाणे अतिक्रमण धारक व्यावसायिकांवर प्रशासकीय शुल्क आकारून कारवाई केली जाते.

त्याप्रमाणेच बेवारस वाहने उचलल्यानंतर वाहन मालकांनी मागणी केल्यास त्यांच्या वाहनांवर प्रशासकीय शुल्क आकारण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार, बेवारस दुचाकींना पाच हजार रूपये प्रतिवाहन, तीन चाकी वाहनांना 15 हजार रूपये प्रति वाहन आणि चार चाकी आणि त्यापुढील वाहनांना 25 हजार रूपये प्रतिवाहन प्रशासकीय शुल्क आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा दंड महापालिकेच्या बीआरटीएस विभागामार्फत वसुल केला जाईल. त्याचा भरणा महापालिकेच्या कोषागारात युटीएफ या मुख्य लेखाशिर्षाखाली नवीन उपलेखाशिर्ष तयार करून जमा करण्यात येईल.

वाहनानुसार दंडात्मक कारवाई
#दुचाकी – 5000 रूपये
#तीन चाकी – 15,000 रूपये
# चार चाकी आणि त्यापुढील – 25,000  रूपये

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.