Pimpri: आत्मनिर्भर योजनेअंतर्गत रेशनकार्ड नसलेल्या नागरिकांना मिळणार मोफत तांदूळ -नामदेव ढाके

एमपीसी न्यूज – लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी केंद्र सरकारने आत्मनिर्भर भारत अर्थ सहाय्य पॅकेज जाहिर केले आहे. या पॅकेज अंतर्गत केंद्राच्या निर्देशानुसार राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेमध्ये समाविष्ट नसलेल्या तसेच रेशनकार्ड नसलेल्या नागरिकांना मे व जून 2020 या दोन महिन्यासाठी प्रतिव्यक्ती प्रतिमाह पाच किलो मोफत तांदूळ वितरण करण्यात येणार आहे. 

या योजनेचा पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महापौर माई ढोरे आणि महापालिकेचे सभागृह नेते नामदेव ढाके यांनी केले आहे.

ढाके म्हणाले, केंद्र सरकारने आत्मनिर्भर योजना सुरु केल्याने या योजनेच्या माध्यमातून रेशनकार्ड नसलेल्या नागरिकांना मोफत तांदूळ मिळणार आहे. या आधी रेशनकार्ड नसलेल्या नागरिकांना हे धान्य देण्यात आले नव्हते.

 आता अशा नागरिकांना पुढील दोन महिने  प्रतिव्यक्ती प्रतिमाह पाच किलो मोफत तांदूळ मोफत मिळणार आहे. औद्योगिकनगरी असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरात देशासह राज्याच्या विविध भागातील नागरिक आपली उपजीविका भागविण्यासाठी आले आहेत. त्यातील काही नागरिक लॉकडाऊनमुळे आपल्या मूळगावी गेले आहेत.

परंतु, अनेक नागरिक शहरात आहेत. त्यांच्याकडे रेशनकार्ड नाही. हाताला रोजगार नाही. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती. त्यांना आता दिलासा मिळणार असून केंद्र सरकारच्या आत्मनिर्भर योजनेअंतर्गत रेशनकार्ड नसले तरी मोफत तांदूळ  मिळणार आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहरातील रेशनकार्ड नसलेल्या नागरिकांनी   क्षेत्रीय कार्यालये, नगरसदस्याकडून अर्ज घेवून ते  भरुन नेमून दिलेल्या स्वस्त धान्य दुकानांमध्ये (दि.30 मे ) पर्यंत जमा करावेत, असे आवाहन महापौर ढोरे आणि सभागृह नेते  ढाके यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like