Pimpri: उद्यापासून अनलॉक दोन! असे आहेत नवीन नियम…प्रतिबंधित क्षेत्रातील दुकानेही होणार सुरू

एमपीसी न्यूज – कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्यात उद्यापासून अनलॉक दोनचा टप्पा सुरू होणार आहे.  राज्य सरकारच्या आदेशानुसार महापालिका क्षेत्रासाठीचे आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आज (मंगळवारी) काढला आहे. त्याची अंमलबजावणी उद्या (बुधवार) पासून  करण्यात येणार आहे. त्यानुसार 31 जुलैपर्यंत लॉकडाऊन कायम ठेवण्यात आले आहे.

प्रतिबंधित क्षेत्रातील दुकाने पी-1, पी-2 या पद्धतीने रोज सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत सुरू राहतील. शहराच्या अन्य भागातील दुकाने मात्र नियमितपणे सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेतच सुरू राहतील.

शहरातील प्रतिबंधित क्षेत्र

1) चिंचवड स्टेशन, 2) पिंपरी कॅम्प, साई चौक, शगुन चौक, 3) गांधी पेठ चाफेकर चौक चिंचवड, 4) काळेवाडी मेनरोड (एम एम स्कुल ते काळेवाडी नदीवरील पुल), 5) अजमेरा पिंपरी, 6) मोशी चौक, मोशी आळंदीरोड, 7) महाराणा प्रताप चौक, निगडी बसस्टॉप, 8) डांगे चौक ते काळेवाडी फाटा, 9) भोसरी आळंदीरोड, 10) कावेरीनगर मार्केट, 11) कस्तुरी मार्केट, थरमॅक्‍स चौक ते साने चौक, 12) दिघी जकात नाका ते मॅगझीन चौक साईबाबा मंदिर.

प्रतिबंधित क्षेत्रातील बाजारपेठामधील दुकाने ही सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत पी-1, पी-2 तत्वानुसार सुरू राहतील. म्हणजेच, रस्त्याच्या एका बाजूची दुकाने सम तारखेस उघडी राहतील व दुसऱ्या बाजुची दुकाने विषम तारखेस उघडी राहतील. सदर बाजारपेठामध्ये ज्या बाजूची दुकाने सुरू असतील त्याच्या विरुध्द बाजूस वाहनांचे पार्किंग करण्यात यावे. जेणेकरून सुरू असलेल्या दुकानांसमोरील जागा सामाजिक अंतराच्या निकषासह ग्राहकांना वापरता येईल.

संपूर्णत: प्रतिबंधित केलेल्या बाबी

#शाळा, कॉलेज , शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था, कोचिंग क्‍लासेस,
# हॉटेल्स, रेस्टॉरंट व इतर आदरातिथ्य सेवा.
# सिनेमा हॉल , शॉपिंग मॉल, व्यायामशाळा, जलतरण तलाव, बार , सर्व प्रकारचे सभागृह, नाट्यगृह, मनोरंजन पार्क आणि तत्सम जागा
# सर्व प्रकारचे सामाजिक , धार्मिक , राजकिय, क्रीडा , मनोरंजन , सांकृतिक , शैक्षणिक उपक्रम , सभा संमेलन व तत्सम मोठ्या संख्येने लोक एकत्र येऊ शकतील अशा प्रकारचे कार्यक्रम
# सर्व धार्मिक स्थळे , सर्व धार्मिक कार्यक्रम , सभा , संमेलने बंद राहतील.

असे आहेत निर्बंध

# नागरिकांच्या हालचाली अत्यावश्‍यक सेवा व वैद्यकीय सेवा या कारणांशिवाय रात्री नऊ ते पहाटे पाच या कालावधीत प्रतिबंधित करण्यात येत आहेत.
# 65 वर्षावरील व्यक्ती, अति जोखमीचे आजार (मधुमेह, उच्च रक्त दाब, दमा, यकृत व मुत्रपिंडाचे आजार, कर्करोग, HIV बाधित रुग्ण इ.) असलेल्या व्यक्ती, गरोदर महिला, 10 पेक्षा कमी वयोगटातील मुले यांना अत्यावश्‍यक सेवा व वैद्यकीय कारणाशिवाय घराबाहेर जाता येणार नाही.
# वैद्यकिय व अत्यावश्‍यक सेवा, तसेच अत्यावश्‍यक वस्तू पुरवठयाची साखळी कायम ठेवण्यासाठी आवश्‍यक वाहतुक वगळता प्रतिबंधीत क्षेत्रामधून नागरिकांना येणे-जाणे करणेसाठी प्रतिबंध असेल. प्रतिबंधीत क्षेत्र (कटेंनमेंट झोन) विषयक महानगरपालिकेने वेळोवेळी निर्गत केलेल्या आदेशातील सर्व सूचनांचे पालन करणे बंधनकारक राहील.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.