Pimpri: गुरुवारी झालेल्या अवकाळी पावसाचा वीज यंत्रणांना  तडाखा; सहा खांब पडले, आठ स्पॅन तुटले

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात गुरुवारी ( दि. 14  )झालेल्या  वादळी वा-यासह झालेल्या अवकाळी पावसाचा मोठा तडाखा महावितरणच्या वीज यंत्रणांना बसला आहे. जोराचा पाऊस आणि वाऱ्यामुळे भोसरी-देहुरोड विभागातील वीजेचे सहा खांब पडले. तर, वीज वाहिनीवरील आठ स्पॅन (गाळे) तुटले. तसेच भोसरी  एमआयडीसीत मुख्य वीज वाहिनीवर मोबाईल टॉवर पडल्यामुळे या परिसरातील वीज वाहिनीचे मोठे  नुकसान झाले.   

शहरातील अनेक भागांमध्ये गुरुवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. शहराच्या पिंपरी, चिंचवड, भोसरी, तळवडे, देहूरोड या भागात पावसाचा जोर जास्त होता. तसेच सोसाट्याचा वाराही होता. याचा फटका महावितरणच्या भोसरी-देहूरोड भागात मोठ्या प्रमाणात बसला.

वादळी वाऱ्यामुळे काही भागात झाडे पडली. तसेच महावितरणचे वीजेचे सहा खांब पडले. त्यामुळे या भागातील वीज पुरवठा खंडीत झाला होता.  भोसरी एमआयडीसी भागात मुख्य वीज वाहिनीवर मोबाईलचा टॉवर पडला.

अवकाळी पावसामुळे महावितरणचे 15  लाखांचे नुकसान !

गुरुवारी शहरात झालेल्या वादळी पावसामुळे महावितरणच्या यंत्रणांचे मोठे नुकसान झाले होते. भोसरी देडूरोड परिसरातील अडीच ते तीन हजार घरांचा  वीज पुरवठा खंडीत झाला होता.  महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी पावसातच दुरुस्तीचे काम हाती घेत पुर्ण केले.

तसेच टप्प्याटप्प्याने सर्व बाधीत ठिकाणचा वीज पुरवठा सुरळीत केला. दरम्यान, गुरुवारच्या पावसामुळे महावितरणचे सुमारे 15 लाखांचे नुकसान झाले आहे, असे महावितरणचे भोसरी विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल गवारे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.