Pimpri : प्रेरणादायी ग्रंथ दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन करतात- विलास लांडगे

0

एमपीसी न्यूज – जीवनात नैराश्य येते तेव्हा प्रेरणादायी ग्रंथ हे दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन करतात असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पिंपरी-चिंचवड जिल्हा कार्यवाह विलास लांडगे यांनी व्यक्त केले. स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ संचलित रवींद्रनाथ ठाकूर सार्वजनिक ग्रंथालयाच्या ३५ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. त्यांच्या हस्ते अजित परांजपे लिखित ‘द्रष्टा तत्त्वचिंतक – दत्तोपंत ठेंगडी’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाचे अध्यक्ष विश्वनाथ नायर, कार्याध्यक्ष भास्कर रिकामे, सचिव प्रदीप पाटील, भारतीय विचार साधनाचे कार्यवाह राजन ढवळीकर उपस्थित होते. दुर्गम ग्रामीण भागात वाचन चळवळ पोहचावी या उद्देशाने तीन ग्रंथालयांना प्रत्येकी पंधरा हजार रुपये किमतीचे ग्रंथदान यावेळी करण्यात आले.

रवींद्रनाथ ठाकूर सार्वजनिक ग्रंथालयाचे कार्यवाह प्रदीप पाटील यांनी ग्रंथालयाच्या पस्तीस वर्षे वाटचालीचा आढावा घेतला. ग्रंथालयाचे दैनंदिन कामकाज संगणकीकृत असून ग्रामीण भागातील वाचनसंस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी आठ वर्षांपासून ग्रंथदानासारखे उपक्रम राबवले जातात. त्याचबरोबर प्रतिवर्षी प्रेरणादायी ग्रंथ प्रकाशित करण्याचा ग्रंथालयाचा संकल्प आहे अशी माहिती दिली.

या वेळी अशोक पाटोळे लिखित आणि रुद्रंग पुणे निर्मित ‘झोपा आता गुपचूप’ या विनोदी नाटकाचे अभिवाचन करण्यात आले, त्यामध्ये रमेश वाकनीस, उज्ज्वला केळकर, सतीश बडवे आणि सागर यादव यांनी सहभाग घेतला. सूत्रसंचालन वृषाली डेंगवेकर यांनी केले तर सतीश सगदेव यांनी आभार मानले.

HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement

You might also like