Pimpri: महापालिका संकेतस्थळावरील सर्व सेवांचे जुने अर्ज नमुने नव्याने अद्ययावत करा

अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांचा सर्व विभागप्रमुखांना आदेश

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका संकेतस्थळावरील सर्व सेवांचे जुने अर्ज नमुने नव्याने अद्ययावत करण्यात यावेत, असे आदेश अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांनी महापालिकेच्या सर्व विभागप्रमुखांना दिले आहेत.

विविध सेवांचे अर्ज नागरिकांना त्वरित उपलब्ध होण्यासाठी महापालिकेच्या संकेतस्थळावर ‘डाऊनलोड’ या सदांतर्गत ‘सीफएस संगणक प्रणाली’, विविध विभागासाठी विकसित करण्यात आलेल्या संगणक प्रणाली आदी ठिकाणी अपलोड करण्यात आले आहेत. त्यानंतर बहूतांश विभागांनी आपल्या विभागांशी संबंधित अर्जामध्ये, तसेच आवश्यक जोडावयाच्या कागदपत्रांंच्या यादीमध्ये बदल केले आहेत. याबाबत नागरीक आणि नागरी सुविधा केंद्र चालकांनी ही बाब महापालिकेच्या निदर्शनास आणून दिलेली आहे.

विवाह नोंदणीसाठी विविध क्षेत्रीय कार्यालयात वेगवेगळ्या स्वरुपाच्या कागदपत्रांची मागणी केली जात आहे. त्यासाठी सर्वसमावेशक सुसूत्रता राहणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने सर्व क्षेत्रीय कार्यालयांनी विवाह नोंदणी अर्ज व त्यासाठी आवश्यक कागदपत्रे यासाठी सर्वसमावेशक एकत्रित अर्ज नमुना तयार करणे गरजेचे आहे. त्यामुळे प्रत्येक विभागाशी संबंधित जे अर्ज नागरिकांसाठी संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले आहेत, त्यांचे अवलोकन करून त्यामध्ये काही बदल असल्यास सुधारीत अर्ज त्वरीत वेबसाईटवर अपलोड करण्यात यावेत. तसेच नव्याने अपलोड करण्यात आलेल्या अर्जांची नमुना प्रत आणि ‘सॉप्ट कॉपी’ माहिती व तंत्रज्ञान विभागाकडे सादर करावी, असे आदेश संतोष पाटील यांनी दिले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.