Pimpri Vaccination News : गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी परवानगी द्या – भाऊसाहेब भोईर

एमपीसी न्यूज – मुंबई महापालिकेच्या धर्तीवर पिंपरी- चिंचवड शहरातही लशींचा मुबलक साठा उपलब्ध झाल्यानंतर गृहनिर्माण सोसायट्यांना खासगी रुग्णालयांशी टायअप करून या रुग्णालयामार्फत लसीकरणाची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांनी केली आहे.

याबाबत महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले आहे. त्यात नगरसेवक भोईर यांनी म्हटले आहे की, आपल्या देशात, पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाची दुसरी लाट आली असून संक्रमित होणाऱ्यांची संख्या धडकी भरविणारी आहे. कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी लसीकरणाचा वेग वाढविणे अत्यंत गरजेचे आहे.

परंतु, सद्यस्थिती पाहता शहरात सर्वत्र लशींचा साठा अत्यल्प प्रमाणात उपलब्ध असून लसीकरण केंद्रे सुद्धा अपुरी पडत आहेत. त्यामुळे लसीकरणाला अद्याप वेग आलेला नाही.

_MPC_DIR_MPU_II

दि. 1 मे पासून 18 ते 44 वर्षे वयोगटातील नागरिकांचेही लसीकरण चालू केले असल्याने लसीकरण केंद्रांवर गर्दी होत असून या ठिकाणी नागरिकांच्या मोठ्या रांगा लागत आहेत. त्यामुळे सामाजिक अंतराचा पूर्णपणे फज्जा उडत असून संक्रमणास पोषक वातावरण निर्माण होत आहे.

परिणामी, लसीकरण केंद्र आणि तेथील कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण येत आहे. याबाबी लक्षात घेऊन मुंबई महापालिकेने लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी खासगी रुग्णालयांना लसीकरणासाठी परवानगी दिलेली आहे. त्यांच्या माध्यमातून खासगी गृहनिर्माण सोसायट्यांच्या आवारात कोविड – 19 लसीकरणासाठी परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. ही परवानगी सोसायट्यांना मिळणार नसून खासगी रुग्णालयांशी टायअप करून सोसायट्यांनी ही परवानगी घ्यावयाची आहे.

मुंबई महापालिकेच्या धर्तीवर आपल्या शहरातही लशींचा मुबलक साठा उपलब्ध झाल्यानंतर खासगी गृहनिर्माण सोसायट्यांना खासगी रुग्णालयांशी टायअप करून संबंधित रुग्णालयामार्फत लसीकरणाची परवानगी देण्यात यावी. यामुळे सोसायट्यांच्या परिसरातील नागरिकांना आहे तिथेच लस मिळेल आणि लसीकरण केंद्रावरील येणारा अतिरिक्त ताण कमी होणार आहे. तसेच समाजिक अंतर राखण्यास सुद्धा मदत होणार असल्याचे भोईर यांनी निवेदनात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.