Pimpri Vaccination News: ग्लोबल टेंडरकाढून कोरोना प्रतिबंधक लस खरेदी करणार : महापौर

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहर कोरोनामुक्त करण्यासाठी प्रतिबंधात्मक लस उत्पादक कंपनीकडून लस खरेदी करण्यात येणार आहे. त्यासाठी जागतिक निविदा (ग्लोबल टेंडर) काढून लस खरेदी करण्यात येणार असल्याची माहिती महापौर उषा ढोरे यांनी दिली. 

संपूर्ण देशासह पिंपरी-चिंचवड शहरामध्ये सुध्दा कोविड 19 विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चाललेला आहे. हा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी महापालिकेच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. या उपाययोजनेअंतर्गत सर्व नागरिकांचे कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करणे हा सर्वात प्रभावी उपाय ठरलेला आहे. पिंपरी-चिंचवड कोरोनामुक्त होण्यासाठी शहरातील प्रत्येक नागरिकाचे लसीकरण होणे अत्यंत गरजेचे आहे.

सद्यस्थितीमध्ये शहरासाठी कोरोना प्रतिबंधात्मक लस शासनाकडून अत्यंत अपुऱ्या प्रमाणात मिळत आहेत. त्यामुळे सर्व नागरिकांचे लसीकरण होण्यास बराच कालावधी लागू शकतो. शासनाने अगोदरच लसीकरणाबाबत नियमावली तयार केली आहे.

तसेच, शहरात 18 ते 44 वयोगटातील नागरिकांची संख्या जास्त आहे. त्यानुसार लस देखील त्याच प्रमाणात मिळणे आवश्यक आहे. शासनाकडून शहरासाठी जो लसींचा साठा उपलब्ध होतो त्यातही शहराबाहेरील नागरिक नोंदणी करून त्याचा फायदा घेतात. त्यामुळे लसींचा पुरवठा पुरेशा प्रमाणात होत नसल्याने शहरातील नागरिकांना लसीकरणापासून वंचित राहावे लागते.

संभाव्य कोरोना प्रादुर्भावाच्या तिसऱ्या लाटेपासून नागरिकांना वाचविण्यासाठी महापालिकेच्या निधीतून उत्पादित कंपन्यांकडून कोरोना प्रतिबंधात्मक लस ग्लोबल टेंडर पध्दतीने थेट खरेदी केली जाणार आहे. त्यासाठी स्थायी समितीला ग्लोबल टेंडर काढण्याबाबत तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे महापौर ढोरे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.