Pimpri Vaccination News : 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण बुधवारी बंद; 45 वर्षांपुढील नागरिकांना दुसरा डोस मिळणार

एमपीसी न्यूज – शासनाकडून महापालिकेला ‘कोविशिल्ड ’ लसीचे केवळ 15 हजार 500 डोस प्राप्त झालेले आहेत. शासनाने दिलेल्या निर्देशानुसार उद्या (बुधवारी) पालिकेच्या लसीकरण केंद्रावर वयवर्षे 18 ते 44 वयोगटामधील लाभार्थींचे लसीकरण करण्यात येणार नाही. फक्त वय वर्षे 45 पेक्षा जास्त वयोगटातील लाभार्थींना ‘कोविशिल्ड लसीचा’ दुसरा डोस देण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेने दिली. दरम्यान, पुण्यामध्येही 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण होणार नाही.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये आज रोजी 8 लसीकरण केंद्रे कार्यान्वित आहेत. नवीन भोसरी रुग्णालय, नवीन जिजामाता रुग्णालय, प्रेमलोक पार्क दवाखाना, यमुनानगर रुग्णालय, डोळ्यांचे हॉस्पिटल –मासुळकर कॉलनी, पिंपळे ‍निलख पी.सी.एम.सी स्कुल, नवीन आकुर्डी रुग्णालय व आहिल्यादेवी होळकर स्कुल सांगवी या लसीकरण केंद्रांच्या ठिकाणी 1600 नोंदणी केलेल्या नागरीक/लाभार्थ्यांपैकी 1560 लाभार्थींना लसीकरण करण्यात आले आहे.

उद्यासाठी स्लॉट बुकिंग करण्याकरिता आज सायंकाळी 18 ते 44 वयोगटातील अनेक नागरिक मोबाईल फोन हातामध्ये घेऊन बसले होते. पण, स्लॉट मिळत नव्हते. त्यामुळे अनेकांचा हिरमोड झाला. रात्री महापालिकेने 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे उद्या लसीकरण होणार नसल्याचे सांगितले.

महापालिकेला आज शासनाकडून फक्त ‘ कोविशिल्ड ’ लस 15 हजार 500 डोस प्राप्त झालेले आहेत. शासनाने दिलेल्या निर्देशानुसार उद्या बुधवारी महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर वय वर्षे 18 ते 44 वयोगटामधील लाभार्थींचे लसीकरण करण्यात येणार नाही.

फक्त वय वर्षे 45 पेक्षा जास्त वयोगटातील लाभार्थींना ‘कोविशिल्ड लसीचा’ दुसरा डोस देण्याची कार्यवाही सकाळी 10 ते सायंकाळी 5 या कालावधीत करण्यात येणार आहे. त्यामुळे वय वर्षे 18 ते 44 वयोगटामधील लाभार्थ्यांनी महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर गर्दी करु नये असे आवाहन महापालिकेने केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.