Pimpri: इस्कॉनच्या अन्नछत्रासाठी एक ट्रक भाजीपाल्यासह विविध साहित्य जमा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात लॉकडाऊनमुळे भोजन व अन्नधान्य घेवू न शकणाऱ्या मजूर व कामगारांना शहरातील विविध स्वयंसेवी संस्थांकडून सहाय्य करण्यात येत आहे. त्याअंतर्गत प्राप्त झालेल्या एक ट्रक भाजीपाल्यासह विविध साहित्य इस्कॉनच्या अन्नछत्रासाठी देण्यात आला. बांधकाम व्यावसायिकांच्या क्रेडाई संस्थेने देखील मदत केली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहरात अकरा ठिकाणी उभारलेल्या निवारा केंद्रांसह विविध भागांत अन्नधान्य उपलब्ध नसणाऱ्या व जेवणाची व्यवस्था नसणाऱ्या नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन विविध सेवाभावी संस्थांना केले होते. त्याला  प्रतिसाद देत  अनेक संस्थांनी इंद्रायणीनगर भोसरी येथील संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुलात साहित्य जमा केले आहे.

त्या आवाहना अंतर्गत प्राप्त एक ट्रक भाजीपाला आज इस्कॉन संस्थेकडे सूपूर्त करण्यात आला. यावेळी अतिरिक्त आयुक्त अजित पवार, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, संदीप खोत, सहाय्यक आरोग्य अधिकारी बी. बी कांबळे, ओमप्रकाश बहीवाल आदी उपस्थित होते.

बाराशे नागरिकांसाठी प्रत्येकी तीन किलो तांदूळ, एक किलो तूरडाळ, गोडेतेल, एक किलो बटाटा व मिरची मसाला असे साहित्य आज जमा केले असून त्याचेही वितरण विविध ठिकाणी करण्यात आले. आणखी आठशे नागरिकांसाठी साहित्याचे वितरण करण्यात येणार असल्याचे क्रेडाई पुणे मेट्रोचे अनिल फरांदे व संतोष कर्नावट यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.