Pimpri : मास्क न वापरणाऱ्या भाजी विक्रेते, किराणा दुकानदारांची ‘कोरोना टेस्ट’ करावी

एमपीसी न्यूज : ‘सोशल डिस्टंसिंग’कडे दुर्लक्ष करणारे तसेच मास्क न वापरणाऱ्या देहूरोड शहर परिसरातील भाजीपाला व फळ विक्री करणाऱ्या विक्रेत्यांसह किराणा दुकानदारांची कोरोना टेस्ट करावी, अशी मागणी शिवजयंती उत्सव समिती प्रमुख पै. बाळासाहेब फाले आणि शिवसेना विभागप्रमुख विजू थोरी यांनी केली आहे.

कॉरोनच्या पार्श्वभूमीवर देहूरोड येथे शुक्रवार आणि शनिवारी कडकडीत लॉकडाऊन पाळण्यात आला. त्यानंतर रविवारी सकाळी भाजीपाला, फळे तसेच किराणा दुकाने सुरु करण्यात आली. दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर नागरिक सकाळीच मोठ्यासंख्येने भाजीपाला आणि किराणा साहित्य खरेदी करण्यासाठी देहूरोड बाजारात दाखल झाले. यामध्ये देहूरोड कॅन्टोन्मेंट हद्दीसह विकासनगर, आदर्शनगर, साईनगर, किवळे या पिंपरी चिंचवड हद्दीतील नागरिकांचा समावेश होता.

नेहमीपेक्षा रविवारी नागरिकांची गर्दी जास्त झाली. त्यामुळे शंकर मंदिर आणि पंडित नेहरु मंगल कार्यालय येथे भाजीपाला खरेदी करताना विक्रेते आणि नागरिकांचे सोशल डिस्टंसिंगकडे दुर्लक्ष झाले. शिवाय अनेक विक्रेते मास्क न लावताच विक्री करताना आढळून आले. काही नागरिकही मास्क न लावताच खरेदीसाठी आले होते.

याचा व्हायचा तो परिणाम झाला. पोलिसांनी याची गंभीर दाखल घेत बेशिस्त विक्रेते आणि नागरिकांना हुसकावून लावत परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यामुळे पोलिसांनी केलेली कारवाई योग्य ठरली. मात्र, भाजीबाजार बंद झाल्याने अनेक ग्राहकांना भाजीपाला खरेदी न करत माघारी परतावे लागले. मात्र, या सर्व प्रकारानंतर मास्क न लावता भाजी व किरणा विक्री केली जात असल्याच्या तक्रारी सुज्ञ नागरिकांनी केल्या.

त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून शासकीय निर्देशांचे पालन न करणाऱ्या भाजी विक्रेत्यांची व किराणा दुकानदारांची तातडीने कोरोना टेस्ट करणे गरजेचे आहे. त्यासाठी देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि पिंपरी चिंचवड महापालिका यांनी तातडीने योग्य ती पावले उचलावीत, अशी मागणी पै. फाले आणि थोरी यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.