Pimpri : फक्त 45 गाड्यांवर धावतंय पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय; लोकप्रतिनिधींसह पोलीस महासंचालकांचेही दुर्लक्ष

अप्पर पोलीस आयुक्तांसह वरिष्ठ पोलीस अधिका-यांची वाहने खिळखिळी

एमपीसी न्यूज – केवळ आयुक्तालय सुरु झाले म्हणजे सगळे चांगले होत नाही. ते सुरळीत चालू होण्यासाठी कित्येक गोष्टींची आवश्यकता असते, त्याची पूर्तता करणं शासनाचे काम आहे. परंतु पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय सध्या मनुष्यबळापासून ते वाहनांपर्यंत अनेक अडचणींचा सामना करीत आहे. 15 पोलीस ठाणे असलेल्या आयुक्तालयात केवळ 45 पोलीस वाहने आहेत. त्यातील बहुतांश कारची अवस्था अतिशय वाईट आहे. ही वाहने कधीही आणि कुठेही बंद पडत आहेत. त्यामुळे खिळखिळ्या झालेल्या या 45 वाहनांवर पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय धावत आहे. या अवस्थेकडे मात्र लोकप्रतिनिधींसह पोलीस महासंचालकांचे देखील दुर्लक्ष आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील वाढत्या उद्योगधंद्यांमुळे शहरात राहणा-या लोकांची संख्या वाढली. अनेक गावे आणि वाड्या-वस्त्या शहरात समाविष्ट झाल्या. त्यामुळे शहराचा प्रशासकीय व्याप वाढला. त्याच प्रमाणात गुन्हेगारी घटनांमध्ये देखील वाढ झाली. याला आळा घालण्यासाठी सर्व स्तरातून पोलीस प्रशासन बळकट करण्याची मागणी करण्यात आली. त्यातून नवीन आयुक्तालय निर्मितीचा पर्याय समोर आला. ब-याच राजकीय, प्रशासकीय घडामोडीनंतर पिंपरी-चिंचवड शहरासाठी 15 ऑगस्ट 2018 रोजी स्वतंत्र आयुक्तालय कार्यान्वित करण्यात आले. त्यानंतर काहींनी ‘आम्ही हे करून दाखवलं’ असा कांगावा वैगेरे केला. पण आयुक्तालयाच्या वास्तविकतेकडे मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय सध्या अनेक समस्यांमधून जात आहे. पिंपरी-चिंचवड शहाराला आयुक्तालय मिळाले, नवे पोलीस आयुक्त, नवे वरिष्ठ अधिकारी मिळाले. पण या अति वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना मात्र मोडकळीस आलेल्या गाड्‌या पुरवण्यात आल्या. सध्या संपूर्ण आयुक्तालयातील पोलीस अधिका-यांसाठी 45 गाड्या आहेत. एवढ्या वाहनांवर पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय धावत असल्याचे चित्र आहे.

मोडकळीस आलेल्या गाड्यांचा फटका अतिवरिष्ठांना बसत आहे. अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांच्या गाडीची अवस्था अतिशय बिकट आहे. गाडीतील बॅटरी पडू नये म्हणून चक्क बॅटरी दोरीने बांधून ठेवली आहे. ही अवस्था पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अति वरिष्ठ पोलीस अधिका-यांच्या वाहनांची आहे.

पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे यांच्या गाडीमध्ये अनेक बिघाड आहेत. त्यांच्या गाडीची चासी प्रत्येक गतिरोधकाला घासते. त्यामुळे गतिरोधक येताच गाडीतील वातानुकूलन यंत्रणा बंद करावी लागते. गतिरोधक गेला की मग ही यंत्रणा पुन्हा सुरु करावी लागते. त्यामुळे त्यांनी वातानुकूलन यंत्रणा बंद ठेवूनच प्रवास करण्याचे ठरविले आहे.

परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त नम्रता पाटील सोमवारी (दि. 8) हिंजवडी पोलीस ठाण्यात कामानिमित्त गेल्या होत्या. पण हिंजवडी मधून निघताना त्यांची गाडी सुरूच होईना. बराच वेळ गाडी दुरुस्त होण्याची वाट पाहून पोलीस उपायुक्तांनी हिंजवडी पोलिसांच्या गाडीतून प्रवास केला.

पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन म्हणाले, “पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात ‘फोन या फ्रेंड’ हा उपक्रम सुरु केला आहे. नागरिकांनी फोन केल्यास तात्काळ पोलीस घटनास्थळी दिसायला हवा. हा या संकल्पनेचा उद्देश आहे. पण वाहनांची कमतरता आणि उपलब्ध वाहनांची दयनीय अवस्था असल्यामुळे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी वैयक्तिक दुचाकी घेऊन घटनास्थळी जात आहेत. गुन्हेगाराचा पाठलाग करायचा आहे, तात्काळ मदतीसाठी पोहोचायचं आहे, अशा वेळी जर वाहनांची अवस्था अशी दुबळी असेल तर आयुक्तालयाची गतिमानता कशी वाढेल?” अशी खंत देखील आयुक्तांनी व्यक्त केली.

पिंपरी-चिंचवड शहराची सध्या लोकसंख्या 22 लाखांच्या पुढे गेली आहे. त्यात आयटी आणि औद्योगिक परिसरात भाड्याने राहणा-या लोकांची संख्या तसेच आयुक्तालयात ग्रामीण भागाची पडलेली भर पाहता हा आकडा 25 लाखांच्या पुढे जाणारा आहे. एवढ्या अवाढव्य लोकांच्या सुरक्षेसाठी केवळ 42 कार आणि तीन व्हॅन अशी एकूण 45 मोडकळीस आलेली वाहणारे धावत आहेत. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाची पुणे आयुक्तालयाशी तुलना करायची झाल्यास पुणे आयुक्तालयात तब्बल 866 वाहने उपलब्ध आहेत. आयुक्तालयासाठी सध्या 200 वाहनांची आवश्यकता आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.