Pimpri : कर्ज फेडण्यासाठी तो करायचा वाहनचोरी

गुन्हे शाखा युनिट दोन कडून वाहनचोराला अटक

एमपीसी न्यूज – कर्ज फेडण्यासाठी वाहनचोरी करणा-या एका चोराला पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट दोनच्या पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून तीन वाहने जप्त करण्यात आली आहेत. ही कारवाई बुधवारी (दि. 19) दुपारी साडेतीन वाजता मोरवाडी चौकात करण्यात आली.

संतोष राजाराम शिंदे (वय 37, रा. नाना कोकरे यांची चाळ, खोली नंबर चार, अंगणवाडी रोड, मोरेवस्ती, चिखली) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर काटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक निलेश बोडखे यांनी माहिती मिळाली की, एक वाहनचोर चोरीची मोटारसायकल घेऊन मोरवाडी कडून पिंपरी कडे येत आहे. त्यानुसार पोलिसांनी मोरवाडी न्यायालयासमोर सापळा रचून संबंधित वाहनचालकाला थांबवण्याचा इशारा केला. मात्र तो मोरवाडीच्या दिशेने वेगात जाऊ लागला. त्यामुळे पोलिसांनी त्याचा पाठलाग करून लालटोपीनगर झोपडपट्टी समोर पकडले. त्याच्याकडे असलेल्या मोटारसायकल बाबत विचारपूस केली असता त्याने उडवा उडवीची उत्तरी दिली. त्यामुळे त्याला गुन्हे शाखा युनिट दोनच्या कार्यालयात आणून कसून चौकशी केली असता त्याच्याजवळ असलेली दुचाकी चोरीची आहे. यासोबतच त्याने आणखी दोन वाहने कुरुळी आणि आकुर्डी येथून चोरल्याचे सांगितले. तिन्ही दुचाकी त्याच्याकडून जप्त करण्यात आल्या आहेत. पिंपरी आणि चाकण पोलीस ठाण्यातील चोरीचे दोन गुन्हे उघड झाले असून निगडी येथील वाहनाबाबत तपास सुरु आहे. आरोपी संतोष त्याच्यावर झालेले कर्ज फेडण्यासाठी वाहने चोरत होता. त्याला पुढील कारवाईसाठी पिंपरी पोलिसांकडे देण्यात आले आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन, पोलीस अप्पर आयुक्त मकरंद रानडे, सहायक पोलीस आयुक्त सतिश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट दोनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर काटे, सहायक पोलीस निरीक्षक सतिश कांबळे, पोलीस उपनिरीक्षक हर्षल कदम, निलेश बोडखे तसेच पोलीस कर्मचारी राहुल खारगे, किरण अरुटे, दत्ता बनसुडे, चेतन मुंढे, संदीप ठाकरे, अतुल लोखंडे, भास्कर भारती, नितेश बिच्चेवार यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.