Pimpri: विधानसभेला महायुतीच्या 240 हून अधिक जागा येतील -रामदास आठवले

वंचित आघाडीमधून आणखीन कार्यकर्ते बाहेर पडतील

एमपीसी न्यूज – भाजप-शिवसेना-आरपीआय महायुती महाराष्ट्रात एकत्र असून आगामी विधानसभेची निवडणूक एकत्रितच लढणार आहोत. महायुतीच्या 240 हून अधिक जागा येतील असा आमचा अंदाज असल्याचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज (बुधवारी) सांगितले. तसेच काँग्रेस-राष्ट्रवादीची महाराष्ट्रात आणि देशात सत्ता येईल, अशी चिन्हे नसल्याने नेते पक्ष सोडत आहेत. वंचित आघाडीमधून आणखीन कार्यकर्ते बाहेर पडतील, असेही ते म्हणाले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात उभारलेल्या भीमसृष्टीचे त्यांच्या हस्ते उद्घाटन झाले. तसेच माता रमाईच्या पुतळ्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.

यावेळी रामदास आठवले म्हणाले, सत्ता मिळवायची असेल. तर, महाराष्ट्रात महायुतीचा पर्याय आहे. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीएचा पर्याय आहे. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते भाजप-शिवसेनेत येत आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीची महाराष्ट्रात आणि देशात सत्ता येईल, अशी चिन्हे त्यांना दिसत नाहीत. महायुतीशिवाय कुठल्याही पक्षाला महाराष्ट्रात सत्ता मिळणे अशक्य आहे.

महायुतीला वंचित आघाडीची अजिबात चिंता नाही. वंचितचा किंचितही परिणाम महायुतीवर होणार नाही. वंचित बहूजन आघाडी मधून एमआयएम पक्ष बाहेर पडला आहे. आणखीन लोक बाहेर पडतील. सत्तेसाठी काही जण वंचितमध्ये गेले असतील. परंतु, वंचित आघाडीला सत्ता मिळणे अशक्य आहे. ज्यांना सत्ता हवी आहे. त्यांनी आरपीआयमध्ये यावे. ज्यांना फक्त निवडणूक लढायची आहे. त्यांनीच वंचित आघाडीतच रहावे, असेही आठवले म्हणाले.

महायुतीत मित्रपक्षांना 18 जागा देण्यात येणार आहेत. त्यापैकी आरपीआयला दहा जागा देण्याची मागणी केली आहे. या मागणीचा विचार करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे. भाजपची शिवसेनेसोबत चर्चा सुरु आहे. मित्र पक्षांना कोणत्या जागा सोडायचा याचा निर्णय झाल्यानंतर आरपीआयला जागा सोडण्याचा निर्णय होणार आहे. दहा जागा मिळाव्यात असा आमचा आग्रह आहे, असेही त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like