Pimpri : पालघर नगरपरिषदेतील विजय हा युतीच्या विजयाची नांदी -श्रीरंग बारणे

देहू गटतील जिल्हा परिषद निवडणुकीचा विजय मावळमधील विजयाचा शुभ संकेत

एमपीसी न्यूज – पालघर नगरपरिषदेच्या निवडणुकीत शिवसेना-भाजप, आरपीआय (आठवले गट) महायुतीने 28 पैकी 20 जागा मिळवित दणदणीत विजय मिळविला. तर, पुणे जिल्हा परिषदेच्या देहू-वडगाव गटात झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या शैला खंडागळे यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळविला असून हा विजय लोकसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयाची नांदी असल्याची प्रतिक्रिया मावळचे शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार, विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली. तसेच देहूगटतील जिल्हा परिषद निवडणुकीचा विजय हा मावळमधील विजयाचा शुभ संकेत असल्याचेही ते म्हणाले.

पालघर नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे आज निकाल जाहीर झाले. यामध्ये 28 जागांपैकी 20 जागांवर शिवसेना-भाजप- आरपीआय (आठवले गट) महायुतीचा दणदणीत विजय झाला आहे. त्यामध्ये शिवसेना 14 तर भाजपने सहा जागा जिंकल्या आहेत. तर, यापुर्वीच दोन्ही पक्षाचे एक-एक उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. याशिवाय पुणे जिल्हा परिषदेच्या देहू-वडगाव गटात झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या शैला खंडागळे या मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्या आहेत.

पुणे जिल्हापरिषदेचा देहूगावगट खासदार बारणे यांच्या मतदारसंघात मोडते. त्यामुळे या ठिकाणी बारणे यांनी जोरदार प्रचार केला होता. हा निकाल मावळ लोकसभा मतदारसंघातील आहे. त्यामुळे हा विजय युतीच्या मावळमधील विजयाचे शुभ संकेत असल्याची प्रतिक्रिया खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली.

यावेळी बारणे म्हणाले, ”जनता काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला कंटाळली आहे. विकास कोण करु शकतो, हे जनतेच्या लक्षात आले आहे. त्यामुळे जनता विकासकामे करणा-या युतीला साथ देत आहे. पालघर नगरपरिषदेत शिवसेना-भाजप, आरपीआय (आठवले गट) महायुतीची एकहाती सत्ता आली आहे. देहू गटात यापूर्वी राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आला होता. आता झालेल्या पोटनिवडणुकीत ती जागा शिवसेनेने मोठ्या मताधिक्याने जिंकली आहे. या विजयाने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. लोकसभा निवडणुकीतील शिवसेनेच्या मावळमधील विजयाची ही नांदी आहे. या विजयाचा फायदा लोकसभा निवडणुकीत होणार आहे. शिवसेना एकत्र लढल्याने हा विजय मिळाला आहे.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.