BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : विकासाची कामे करुन पक्षाचे नाव मोठे करा; ‘सीएम’ची स्थायी समिती सभापती मडिगेरी यांना सूचना

मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन विलास मडिगेरी यांनी मानले आभार

PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज – राजकारणात काम करणाऱ्या सर्वांना संधी मिळत नाही. आपल्याला स्थायी समिती सभापतीच्या रुपाने जनतेची सेवा आणि विकासाचे काम करण्याची संधी मिळाली आहे. त्याच्या माध्यमातून शहराच्या विकासात भर घालणारे नावीन्यपुर्ण आणि मोठे प्रकल्प करा. भाजपचे नाव मोठे करा अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती विलास मडिगेरी यांना केल्या. तसेच शहराचा विकास करताना कोणत्याही अडचणी आल्यास राज्य सरकार तुमच्या पाठिशी ठाम उभे राहील, असे आश्वासनही त्यांनी दिले.

सर्वांत श्रीमंत महापालिका अशी ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी विलास मडिगेरी यांची वर्णी लागली. निष्ठावान आणि स्वच्छ प्रतिमा असलेल्या मडिगेरी यांना भाजपने स्थायीचे सभापतीपद दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईतील वर्षा निवासस्थानी जाऊन मडिगेरी यांनी भेट घेतली. आभार मानले आणि काम करण्याची संधी दिल्याबद्दल ऋण व्यक्त केले. यावेळी किरण करांडे, सुभाष मडिगेरी, राजेंद्र जगताप, मयूर मडिगेरी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ”राजकारणात असंख्य कार्यकर्ते काम करतात. त्यापैंकी कमी लोकांना एखाद्या पदावर काम करण्याची संधी मिळते. आपल्याला स्थायी समिती सभापतीपदाच्या रुपाने मोठी संधी मिळाली आहे. त्याचे सोने करा. शहराच्या विकासात भर घालणारे नावीन्यपूर्ण आणि मोठे प्रकल्प करा. समाज नेहमी चांगली कामे लक्षात ठेवतो. त्यासाठी शहरासाठी चांगले काम करा”

“मी पहिल्यांदा 1992 साली नागपूर महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आलो. त्यानंतर 1997 ला महापौर झालो. महापौरपदावर असताना केलेले काम आणि त्यातून निर्माण झालेल्या प्रतिमेचा मुख्यमंत्री होण्यासाठी उपयोग झाला” असा स्वत:चा अनुभव सांगत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ” राजकीय जीवनात मिळालेल्या पदाच्या माध्यमातून चांगले काम करावे. या पदाच्या माध्यमातून चांगले काम करण्याची आता तुमची जबाबदारी आहे” असेही ते मडिगेरी यांना म्हणाले.

स्थायी समिती सभापती काम करण्याची संधी दिल्याबाबत पार्टी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानत या पदाच्या माध्यमातून शहर हिताचे आणि पक्षाच्या संस्कृतीला शोभेल असे काम करण्याची ग्वाही मडिगेरी यांनी यावेळी दिली.

.

HB_POST_END_FTR-A1
.