Pimpri: गावकऱ्यांनो, हे वागणं बरं न्हवं ! ; गावबंदी करणाऱ्यांचे पुणे-मुंबईकरांनी टोचले कान

एमपीसी न्यूज- संपूर्ण जगामध्ये कोरोना या विषाणूजन्य रोगाने थैमान घातले आहे. विशेषतः पुणे, मुंबई सारख्या शहरावर या रोगाचा विळखा पडला आहे. त्यामुळे आपले स्वतःचे गाव सोडून शहरात पोटापाण्यासाठी आलेल्या गावकऱ्यांनी आपल्या गावची वाट धरली; मात्र या गावांनी आता पुणे-मुंबईकरांसाठी गावचे रस्ते बंद केले आहेत. पुण्या-मुंबईच्या लोकांनी गावाकडे येऊ नका, अशा प्रकारच्या पोस्ट काही जण टाकत आहेत. गावकऱ्यांनी घेतलेल्या या भूमिकेचा पुणे- मुंबईकर नागरिकांनी व्हॉट्सअपच्या माध्यमातून खरपूस समाचार घेतला आहे. तर, जुन्नरमध्ये पुणे, मुंबईतून आलेल्या तब्बल 19000 लोकांना होम क्वारंटाईन करण्यात येणार आहे. गावकरी संशयाने बघत असल्याने हे आपलेच गाव आहे का ?, असा प्रश्न पुण्यात राहणा-या नागरिकांना पडला आहे.

उदरनिर्वाहासाठी, उच्च शिक्षणासाठी आपले गाव सोडून अनेकजण शहराची वाट धरतात. शहरात राहत असतानाही गावाची ओढ जरादेखील कमी झालेली नसते. आपल्यापरीने प्रत्येकजण गावाच्या विकासासाठी प्रयत्न करतो. प्रत्येकाला आपले गाव प्रिय असते. ते गाव आरोग्यपूर्ण राहावे, त्याला बाहेरच्या लोकांची बाधा होऊ नये हे मान्य केले तरी सध्या या गावकऱ्यांनी घेतलेल्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यांच्या या भूमिकेचा निषेध केला जात आहे.

मुंबई, पुण्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. त्यामुळे नागरिक आपल्या मूळगावी जात आहेत. शहरातून गावात जाणा-या प्रत्येक नागरिकाकडे कोरोना झाल्याच्या भावनेने पाहिले जात आहे. त्यांना वेगळी वागणूक दिली जात आहे. गावात प्रवेश करण्यापासून मज्जाव केला जात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे हे आपलेच गाव आणि आपलीच मानसे आहेत का, असा प्रश्न पुण्या, मुंबईतून गावात जाणा-या नागरिकांना पडला आहे. या नागरिकांना कोणतीही आवश्यकता नसताना होम क्वारंटाईन राहण्यास सांगितले जात आहे. ज्यांना क्वारंटाईनची आवश्यकता आहे. त्यांच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारला जातो. परंतु, शिक्का नसताना देखील नागरिकांना त्रास दिला जात असल्याचे दिसून येत आहे.

_MPC_DIR_MPU_II

गावामध्ये राहताना आवश्यक त्या बाबींची काळजी घेऊन इतरांना अडचण होणार नाही याची खबरदारी घेऊन थांबायला काय हरकत आहे. याशिवाय सरकार सगळ्या प्रकारची शहानिशा करत आहेच. पुणे,मुंबई मधून आलेल्या सर्वांनाच कोरोना झालायं अशा भावनेतुन त्यांच्याकडे पहाण कितपत योग्य आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

व्हॉट्सअपच्या माध्यमातून पुणे- मुंबईकरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. या पोस्टमध्ये म्हटलंय की ‘आज पुणे – मुंबईकर संकटात सापडला असताना त्यांना धीर देणे राहिले दूर, आपण लोकांनी आपल्यासाठीच गाव बंद केला आणि त्याचे फोटो आम्हाला पाठवता. एक लक्षात ठेवा गावी महापुराच्या वेळी आम्ही आपले गाववाले पुरात अडकले आहेत, म्हणून त्यावेळी आपल्यासाठी ट्रकच्या ट्रक भरून साहित्य पाठवले. आम्ही लोक त्यावेळी आम्ही आपल्याशी असे वागलो नाही. पण, तुम्ही आमच्याशी इतके वाईट वागणूक दिली ही खंत आयुष्यभर नक्कीच राहील.

#ते हेच लोक आहेत ज्या वेळी गावात एखादा कार्यक्रम करायचा असेल त्यावेळी वर्गणी मागायला पहिल्यांदा पुण्या-मुंबईच्या लोकांची लिस्ट काढतात.
#ते हेच लोक आहेत जे निवडणूक आली की पुण्या-मुंबईच्या लोकांना दहा दहा फोन करतात.
#ते हेच लोक आहेत मला, आमच्या पोरांना पुण्या-मुंबई मध्ये जॉब बघ म्हणून मागे लागतात.
#ते हेच लोक आहेत जे पुण्या-मुंबईत माझं काम आहे मी दोन दिवस तुझ्याकडे येतो म्हणून कॉल करतात.
#गावचे रस्ते बंद करून काय हे सिद्ध करतायत आम्ही पुणे, मुंबई वाले काय पाकिस्तानी आहोत का ?
एक लक्षात ठेवा… “वेळ बदलायला वेळ लागत नाही ” एक पुणे- मुंबईकर.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.