Pimpri : की घेतले व्रत न हे आम्ही अंधतेने…

(मानसी मगरे)

एमपीसी न्यूज- 26 फेब्रुवारी हा सावरकरांचा स्मृतीदिन. या दिनाच्या औचित्याने राष्ट्रीय स्तरावर कार्यरत सावरकर मंडळातर्फे सावरकरांप्रमाणेच राष्ट्रसेवा हे व्रत घेऊन राष्ट्रहित व सेवा क्षेत्रात भरीव कार्य करणाऱ्या संस्था किंवा व्यक्तींना ‘स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार’ देऊन गौरविण्यात येते. राष्ट्रीय व राज्यस्तरीय अशा दोन पातळ्यांवर दर वर्षी हा पुरस्कार देण्यात येतो. यंदा केरळ राज्यातील शिक्षक-स्वयंसेवक मास्टर सदानंद यांना राष्ट्रीय स्तरावरील पुरस्काराने गौरविण्यात येणार असून राज्यस्तरीय पुरस्कारासाठी नागपूरच्या जन-संघर्ष समिती या संस्थेची निवड करण्यात आली आहे… या पुरस्कारार्थींच्या कार्याचा आढावा घेणारा हा लेख…

सावरकर म्हणजे प्रखर देशभक्ती.. सावरकर म्हणजे क्रांतीकारी विचारसरणी, सावरकर म्हणजे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक क्रांतीकारी चळवळीचे धुरीण, सावरकर म्हणजे स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर भारतीय राजकारणातील एक महत्त्वाचे राजकारणी, सावरकर म्हणजे हिंदूसंघटक व हिंदुत्वाचे तत्त्वज्ञान मांडणारे तत्त्वज्ञ, सावरकर म्हणजे प्रतिभावंत कवी, लेखक, साहित्यिक आणि प्रचारक अशी आणि अशा अनेक विशेषणांनी अवघा भारत विनायक दामोदर सावरकर यांना ओळखत आला आहे. याच सावरकरांना प्रसिद्ध मराठी लेखक व पत्रकार प्रल्हाद केशव अत्रे यांनी ‘स्वातंत्र्यवीर’ ही उपाधी दिली.

26 फेब्रुवारी हा सावरकरांचा स्मृतीदिन. या दिनाच्या औचित्याने राष्ट्रीय स्तरावर कार्यरत सावरकर मंडळातर्फे सावरकरांप्रमाणेच राष्ट्रभक्ती, राष्ट्रनिष्ठा व राष्ट्रसेवा हे व्रत घेऊन धर्मरक्षण, राष्ट्रहित व सेवा क्षेत्रात भरीव कार्य करणाऱ्या संस्था किंवा व्यक्तींना स्वातंत्र्यवीर पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. राष्ट्रीय व राज्यस्तरीय अशा दोन पातळ्यांवर दर वर्षी हा पुरस्कार देण्यात येतो. या पुरस्काराचे हे 13 वे वर्ष आहे. यंदा केरळ राज्यातील शिक्षक-स्वयंसेवक मास्टर सदानंद यांना राष्ट्रीय स्तरावरील पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे, तर राज्यस्तरीय पुरस्कारासाठी नागपूरच्या जन-संघर्ष समिती या संस्थेची निवड करण्यात आली असून संस्थेचे अध्यक्ष दत्ताजी शिर्के यांचा गौरव करण्यात येणार आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मृतीदिनी म्हणजेच बुधवार, 26 फेब्रुवारी रोजी पुण्यातील निगडी परिसरात असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या सभागृहात संध्याकाळी सहा वाजता हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यात बडवे इंजि. लि. चे श्रीकांत बडवे यांच्या हस्ते हे दोन्हीं पुरस्कार प्रदान करण्यात येतील. राष्ट्रीय पुरस्कारासाठी एक लक्ष रुपये आणि राज्यस्तरीय पुरस्कारासाठी ५१ हजार रुपये असे या पुरस्कारांचे स्वरुप आहे. या पुरस्कार कार्यक्रमाबरोबरच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य सुहासराव हिरेमठ यांच्या विशेष व्याख्यानाचेही या वेळी आयोजन करण्यात आले आहे.

संस्कार भारती, पिंपरी-चिंचवड निर्मित स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनचरित्रावर आधारित ‘अनंत मी – अवध्य मी’ या कार्यक्रमाने सोहळ्याची सुरुवात होईल. या कार्यक्रमास उपस्थित राहून आपले देशप्रेम व्यक्त करावे, असे आवाहन स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळातर्फे करण्यात आले आहे.

राष्ट्रीय पुरस्कारार्थी शिक्षक-स्वयंसेवक सदानंद मास्टर 

केरळसारख्या सीपीएम (कम्युनिस्ट)बहुल विचारसरणी असलेल्या आणि त्यातही साम्यवादी विचारसरणी (कम्युनिझम) जपणाऱ्या कन्नूर गावातील कुटुंबात वाढलेले आणि तशीच विचारसरणी असलेले सदानंदजी कामाच्या ओघात एका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकाच्या संपर्कात आले. मैत्रीच्या वाहत्या प्रवाहात संघाच्या हिंदुत्ववादी आणि देशप्रेमी विचारसरणीचा त्यांच्यावर प्रभाव पडला आणि साम्यवादी विचारांचे सदानंदजी केवळ स्वयंसेवकच झाले नाही, तर पुढे त्यांनी संघ कार्यकारिणीतील अनेक पदांवर कार्य केले. गटनायक, मुख्य शिक्षक, तालुका कार्यवाह असा त्यांचा प्रवास आणि कार्य सुरू होते. हीच बाब नेमकी त्यांच्या आजूबाजूला असलेल्या साम्यवादी विचारसरणीच्या लोकांना खटकत होती. याचीच परिणीती पुढे विकृतीत झाली. सदानंदजी संघाच्या कार्यात जिल्हा कार्यवाह झाले आणि या विकृत लोकांनी त्यांच्यावर निर्दयीपणे हल्ला करून त्यांचे दोन्हीं पाय छाटून टाकले.

या जीवघेण्या हल्ल्यानंतरही सदानंदजी थांबले नाहीत. यातून सावरत कृत्रिम पाय बसवून ते पुन्हा नव्या जोमाने कामाला लागले. साम्यवादी विचारसरणीचा पगडा असणाऱ्यांना ते पुन्हा समुपदेशनाने विधायक कार्याकडे वळवण्याचे प्रयत्न करू लागले. त्यांच्या या अथक प्रयत्नांमुळे पूर्वी साम्यवादी विचारसरणी असलेला भाग म्हणून ओळखला जाणारे त्यांचे गाव, प्रांत आता संघ विचारांचे गाव म्हणून सर्वश्रूत आहे. आपल्या प्रभावी लेखनातून आणि व्याख्यानांच्या माध्यमातूनही ते अनेकांमध्ये राष्ट्रभक्ती आणि विधायक कार्याप्रती समर्पण भावना रुजवण्याचे कार्य करत आहेत. त्यांच्या या समर्पण वृत्तीने केल्या जाणाऱ्या कार्याप्रतीचा गौरव म्हणून त्यांना हा राष्ट्रस्तरीय पुरस्कार प्रदान केला जात आहे. हा पुरस्कार म्हणजे खऱ्या अर्थाने त्यांच्या कार्याचा गौरव ठरेल.

राज्यस्तरीय पुरस्कारार्थी संस्था जन-संघर्ष समिती, नागपूर

गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुका आणि परिसर हा अतिशय दुर्गम, संवेदनशील असून नक्षलबहुल आहे. या परिसरात राहत असलेल्या आदिवासी लोकांमध्ये येथील नक्षलवादींची खूप मोठ्या प्रमाणात दहशत आहे. या परिस्थितीत वनात राहणाऱ्या या आदिवासी लोकांना जर शिक्षण, आरोग्यसुविधा व रोजीरोटीचे साधन मिळाले, तर हे आदिवासी उठाव करून आपला बिमोड करतील या भीतीने येथील नक्षलवादी या परिसराचा कोणत्याच प्रकारचा विकास होऊ देत नाहीत. परंतु या विपरित परिस्थितीत आदिवासी बांधवांसाठी कार्य करत आहे, ती नागपूरची जन-संघर्ष समिती.

मागील काही वर्षांपासून जनसंघर्ष समिती या धोकादायक परिस्थितीत आदिवासी बांधवांसाठी कार्यरत आहे. आदिवासी बांधवांच्या मनातील नक्षलवाद्यांचे भय नष्ट करणे हे या कार्याचे प्राथमिक पाऊल आहे, हे ओळखून समितीने सर्वप्रथम नक्षलवाद्यांची भीती नाहीशी करण्याचे कार्य हाती घेतले आहे. यासाठी भयमुक्ती आंदोलन, तसेच आरोग्य व शिक्षण क्षेत्राच्या माध्यमातूनही अनेक उपक्रम राबवले जात आहेत. स्वातंत्र्यदिन तसेच प्रजासत्ताकदिनानिमित्त झेंडावंदन, तिरंगा यात्रा यांमार्फत या आदिवासी बांधवांमध्ये देशभक्ती जागवली जाते. अंधश्रद्धा दूर करणे, आरोग्यशिक्षण देणे, आपत्ती काळात मदत करणे, औषधोपचार करणे, रोजगार उपलब्ध करून देणे, स्वयंरोजगारातून निर्मित मालाला बाजारपेठ उपलब्ध करून देणे, या आणि अशा अनेक पातळ्यांवर जनसंघर्ष समिती कार्य करत आहे. विशेषतः आदिवासी युवकांमध्ये शिक्षण आणि अर्थार्जनाचे महत्त्व जागृत करत आहे. त्यासाठी संस्थेमार्फत विविध उपक्रम राबवले जातात. या पद्धतीने आदिवासी कल्याणासाठी आणि पर्यायाने अप्रत्यक्षरीत्या देशाच्या विकासाठी हातभार लावणारी जन-संघर्ष समिती ही संस्था खऱ्या अर्थाने या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी मानकरी ठरली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.