Pimpri : अन् उलगडले दिल्लीच्या ‘आप’ल्या माणसाचे पुण्याशी जिव्हाळ्याचे नाते…

एमपीसी न्यूज- कालच परवाच दिल्लीच्या निवडणुकांचा निकाल जाहीर झाला. त्याला धक्कादायक असे म्हणता येणार नाही. कारण यातील सत्तारुढ असलेला मुख्य पक्ष म्हणजे आम आदमी पार्टी आम्ही पुन्हा एकदा मोठ्या फरकाने सत्तेत येणार असे पहिल्यापासूनच सांगत होती. मात्र केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपाचा यावर विश्वास नव्हता. परंतु निकाल लागल्यावर ज्याला त्याला आपली खरी ताकद कळली असेलच. हे सगळं आठवण्याचे कारण म्हणजे या विजयाचे खरे श्रेय कोणाकडे जात असेल तर ते ‘आप’चे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांच्याकडे. या निमित्ताने इंडियन एक्सप्रेस या नामवंत वृत्तसमूहाच्या वृत्तपत्राच्या पुण्यातील जाणकार ज्येष्ठ पत्रकार विनिता देशमुख यांनी यानिमित्ताने काही आठवणी ‘एमपीसीन्यूज’शी शेअर केल्या.

सुमारे दहा वर्षांपूर्वी जर अरविंद केजरीवाल कोण असा गुगलला जरी सर्च दिला असता तरी फारशी माहिती मिळाली नसती अशी परिस्थिती होती. आज मात्र देशाच्या राजधानीचा कारभार समर्थपणे हाकण्याचे खरे श्रेय कोणाचे असा प्रश्न केला तर निर्विवादपणे अरविंद केजरीवाल यांच्याकडेच बोट दाखवावे लागते. अर्थात हे सारे काही एका रात्रीत झालेले नाही. मग हे घडले कसे, तर याच्या काही आठवणी विनिता देशमुख यांनी सांगितल्या.

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या प्रयत्नांमुळे ‘राइट टु इन्फर्मेशन’ म्हणजे ‘माहितीचा अधिकार’ हा कायदा अस्तित्वात आला असे म्हटले तर वावगे होणार नाही. पुण्यात याविषयी नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचे श्रेय जाते ते ज्येष्ठ पत्रकार आणि तेव्हाचे इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्राचे संपादक प्रकाश कर्दळे यांना. या माध्यमातून कर्दळे यांच्या सहकारी असल्यामुळे विनिता देशमुख या देखील चळवळीशी जोडल्या गेल्या.

दिल्लीत त्याकाळी म्हणजे साधारण 2003/04 च्या सुमारास अरविंद केजरीवाल नावाचा एक तरुण सरकारी अधिकारी ‘परिवर्तन’ या त्याच्या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून झोपडपट्टींमध्ये जाऊन लोकांची बारीकसारीक कामे आपुलकीने करुन देत असे. त्यांना माहितीच्या अधिकाराची जाणीव करुन देत असे. त्यांच्याशी विनिता यांची भेट झाली. अरविंद यांनी अण्णांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली आणि साधारण 2009 च्या सुमारास अण्णा आणि केजरीवाल यांची राळेगणसिद्धीला भेट झाली. त्यावेळी अरविंद यांना ‘मेगॅसेसे’ पुरस्कार मिळाला होता.

त्या भेटीत सुरुवातीला अरविंद आणि अण्णा हजारे यांची फारशी बातचीत झाली नाही. विनिता त्यावेळी तिथे हजर होत्या. अखेरीस राळेगणसिद्धीचा पाहुणचार घेऊन ते सर्वजण निघत असतानाच अण्णांनी अरविंद यांची पुन्हा भेट घेतली. त्यावेळी अरविंद यांनी अण्णांना दिल्लीत येण्याची विनंती केली. भ्रष्टाचार खूप वाढला आहे, लोकजागृती करायला हवी आणि त्यासाठी अण्णा हजारे, रामदेवबाबा यांसारख्या पब्लिक फिगरनी त्यात सहभागी व्हायला हवे हे त्यांनी पटवून दिले. त्यानंतर अण्णांनी अरविंदच्या साथीने दिल्लीतील रामलीला मैदानावर आंदोलन केले हा सर्वश्रुत इतिहास आहे.

अशा प्रकारे अरविंद केजरीवाल यांच्या कार्याशी विनिता पुढे जोडल्या गेल्या. आम आदमी पक्षाच्या नामकरण समारंभाला त्यांना दिल्लीला खास आमंत्रण होते. त्यासाठी त्या गेल्यादेखील होत्या. पुढे कामाच्या व्यापात अरविंद केजरीवाल व्यस्त झाले आणि भेटीगाठी कमी झाल्या. पण आपल्या समोर एका व्यक्तीचा समंजस राजकारणी हा प्रवास कसा रंजक झाला याच्या विनिता साक्षीदार आहेत.

पुढील काळात पिंपरी चिंचवड येथील एम्पायर इस्टेट या गृहनिर्माण सोसायटीच्या तेथून जाणा-या उड्डाणपुलाचा प्रश्न निर्माण झाला होता. तेथील रहिवाशांनी आंदोलन देखील केले होते. त्या आंदोलनाला मार्गदर्शन करण्यासाठी अरविंद केजरीवाल पिंपरी-चिंचवडमध्ये आले होते. तसेच माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी त्यांची पहिली वॉर्डसभा घेतली त्यासाठी देखील अरविंद आवर्जून उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.