Pimpri: ‘सीएए’मुळे देशात एकही घुसखोर राहणार नाही – विनोद तावडे

एमपीसी न्यूज – नागरिक संशोधन कायद्यामुळे अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेश या तीन देशांमधून धर्माच्या नावाने झालेल्या छळामुळे, पिळवणुकीमुळे आणि अत्याचारामुळे पळून जाऊन भारताच्या आश्रयाला आलेल्या गैरमुस्लिम विस्थापितांना अर्थात हिंदू, शीख, बौद्ध, ख्रिश्चन, पारशी आणि जैन बांधवांना भारताचे नागरिकत्व मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. स्वातंत्र्यापासून आणि त्यानंतरही भारतात आश्रिताचे जीणे जगण्याचा त्यांच्या माथ्यावरील कलंक मिटणार आहे. या कायद्यामुळे देशात एकही घुसखोर शिल्लक राहणार नसल्याचे मत भाजपचे नेते विनोद तावडे यांनी व्यक्त केले.

पिंपरी येथील बी.टी. आडवाणी धर्मशाळा हॉल मध्ये आज (गुरुवारी) सीएए कायद्याच्या समर्थनार्थ आयोजित मार्गदर्शन शिबिरात तावडे बोलत होते. यावेळी खासदार अमर साबळे, भाजप शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे, पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी अध्यक्ष विलास मडिगेरी, उमा खापरे, नगरसेवक संदीप वाघेरे, राजेश पिल्ले, ज्योतिका मलकानी, रवी अनासपुरे, जयदेव डेंब्रा, महिंद्रा बावीस्कर, जयेश चौधरी, दिलीप मदनाणी, सद्दूशेठ नागपाल, मोहित बुलाणी, शुभम शिंदे, आकाश चव्हाण, किरण शिंदे, श्रीकांत वाघेरे तसेच पिंपरीतील सिंधी बांधव यांचाही सहभाग मोठ्या प्रमाणावर होता.

तावडे म्हणाले की, 1947 मध्ये अखंड भारताची फाळणी होऊन पाकिस्तानची निर्मिती झाली. त्यावेळी पाकिस्तानच्या एकूण लोकसंख्येपैकी तेथे हिंदू धर्मीय नागरिकांचे प्रमाण 15 टक्के होते. आता हेच प्रमाण अवघ्या दीड टक्क्यावर आले आहे. फाळणी झाली तेव्हा कोट्यवधी हिंदुंना पाकिस्तानातच राहण्याशिवाय पर्याय राहिला नव्हता. पाकिस्तानातल्या हिंदुंचे पूर्वज शेकडो वर्षांपासून भारतात राहत होते. पाकिस्तानातील असुरक्षित स्थितीमुळे त्यांना साहजिकच भारतात आश्रय घ्यावासा वाटतो आहे. त्यांना भारतीयत्व नाकारणे अन्यायकारक ठरणार आहे. म्हणून नागरिकत्व संशोधन कायदा देशाच्या दोन्ही सभागृहात पारित केल्यामुळे केंन्द्र सरकारचे अभिनंदन सर्व स्तरातून होत आहे. नागरिकता कायद्यावरून देशाच्या काही भागात विरोधाचे सूर उमटत आहेत. विविध ठिकाणी सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात आंदोलनांना प्रारंभ झाला असून, या कायद्याच्या विरोधात अनेक जण रस्त्यांवर उतरले आहेत. आंदोलकांमागे शहरी नक्षलवाद्यांसह अन्य फुटरवादी शक्तींची उभी असलेली साथ लपून राहिलेली नाही.

नागरिकत्व मिळाल्याने इतर नागरिकांना लागू असलेल्या कायद्यांचा अंमल त्यांच्यासाठी सुकर होणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे नोकरी, शिक्षण आदींच्या संदर्भातील आरक्षण, शिष्यवृत्ती अथवा सरकारी योजनांचे लाभ त्यांच्या पदरात पडणार आहेत. परंतु कोंग्रेस या सर्व गोष्टीं विषयी समाजामध्ये गैरसमज निर्माण करून भावा भावामध्ये भांडणे लावण्याचा प्रयत्न करत आहे, आपण सर्वांनी एक होऊन अशा प्रवृत्तींवर मात करून सर्व सिंधी बांधवांनी एकत्र येऊन नागरिकत्व संशोधन कायदा २०१९ निर्भीडपणे घराघरात पोहचवावा असे आवाहनही तावडे यांनी केले.

या मेळाव्यानंतर विनोद तावडे यांच्या नेतृत्वात नागरिकत्व संशोधन कायद्याच्या समर्थनार्थ पिंपरी कॅम्प येथे पदयात्रा काढण्यात आली. कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रस्तावित नगरसेवक संदीप वाघेरे यांनी केले, तर सूत्रसंचालन स्वीकृत नगरसेविका वैशाली खाड्ये यांनी केले. तसेच कार्यक्रमाचे नियोजन सर्व सिंधी समाज पिंपरी व भीमज्योत तरुण मित्र मंडळ, पिंपरीगाव यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.