Pimpri: दहा नागरिकांकडून ‘होम क्वारंटाईन’चे उल्लंघन; महापालिकेने बजाविली नोटीस

एमपीसी न्यूज – परदेशातून पिंपरी-चिंचवड शहरात आलेल्या 1 हजार 21 नागरिकांना ‘होम क्वारंटाईन’मध्ये (वेगळ्या कक्षात) ठेवण्यात आले आहे. या नागरिकांनी किमान 14 दिवसासाठी व आवश्यकता भासल्यास पुढील 28 दिवसांपर्यंत घरातच थांबणे आवश्यक आहे. मात्र यापैकी दहा नागरिकांनी ‘होम क्वारंटाईन’चे उल्लंघन केले आहे. त्यामुळे त्यांना महापालिकेने नोटीस बजाविली आहे. दरम्यान, आजअखेर शहरातील 3 लाख 73 हजार 414 नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.

प्रशासनाच्या सूचनांचे पालन न केल्यास होम क्वारंटाईनमधील नागरिकांवर कारवाई केली जाणार आहे. त्यानुसार त्यांना पोलिसांमार्फत ताब्यात घेऊन 14 दिवस क्वारंटाईनची व्यवस्था केलेल्या ठिकाणी राहावे लागणार आहे. या आदेशाचे उल्लघन करणा-यांना कायद्यानुसार सहा महिन्यांपर्यंत शिक्षेची तरतूद आहे. त्यामुळे नागरिकांनी सर्व सुचनांचे पालन करावे, असे आवाहन महापौर उषा ढोरे, सभागृह नेते नामदेव ढाके यांनी केले आहे. नागरिकांनी घरी, कामाच्या ठिकाणी अथवा वाहनामधील वातानुकुलीत यंत्रणेचा वापर टाळावा. तसेच शहरात कलम 144 लागू झाले आहे. त्यामुळे शहरातील दुकाने व आस्थापना बंद ठेवण्यात येत असून, अत्यंत आवश्यक असल्यासच नागरिकांनी घराबाहेर पडावे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय व नवीन भोसरी रुग्णालयामधून आजपर्यंत 124 व्यक्तींचे कोरोना करीता घश्यातील द्रव्यांचे नमुने ‘एनआयव्ही’ पुणे येथे तपासणी करीता पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी आज अखेर 109 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत. कोरोना बाधित रुग्णांची संख्या 12 आहे. सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर महापालिका रुग्णालयांमधील ‘आयसोलेशन’ कक्षामध्ये उपचार सुरु आहेत. तसेच आज (सोमवारी) तीन व्यक्तींना भोसरीतील रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या घशातील द्रव्याचे नमुने तपासणी करीता पाठविण्यात आले आहेत.

कोरोना संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेच्या 244 कर्मचाऱ्यांची क्षेत्रीय सर्वेक्षण टिम घरोघरी जाऊन सर्वेक्षण करत आहे. यामध्ये आजपर्यंत शहरातील तीन लाख 73 हजार 414 नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. आजअखेर एक हजार 21 व्यक्तींना घरातील अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. घरातील अलगीकरणात असणा-या नागरिकांनी बाहेर पडू नये. अशी व्यक्ती बाहेर पडल्याचे आढळल्यास त्याची माहिती महापालिकेच्या सारथी हेल्पलाईन ८८८८००६६६६ यावर कळवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

परदेश प्रवास करुन चीन, डेमोक्रेटिक रिपब्लीक ऑफ कोरिया, फ्रान्स, जर्मनी, स्पेन, इटली, इरान, दुबई, सौदी अरेबिया, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, कतार, ओमान, कुवेत आणि युनाटेड अरब अमिरात या देशांमधून आलेल्या सर्व नागरिकांनी किमान 14 दिवस स्वत:हून घरामध्येच होम क्वारंटाईनमध्ये रहावे. जे नागरिक घरामध्ये राहणार नाहीत. अशा नागरिकांचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात येवून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तसेच या देशांमधून प्रवास करुन आलेल्या नागरिकांनी याबाबतची माहिती आपल्या घराजवळील महापालिकेच्या दवाखाना किंवा रुग्णालयात तातडीने द्यावी.

याबाबत महापालिकेमार्फत हेल्पलाईन कार्यान्वित करण्यात आलेली आहे. हेल्पलाईन क्रमांक ८८८८००६६६६ हा आहे. तसेच ९९२२५०१४५० हा Whatsapp क्रमांक कार्यान्वित करण्यात आलेला आहे. राज्य शासनामार्फत कार्यान्वित idsp.mkcl.org या संकेतस्थळावर संशयित कोरोना रुग्ण संबंधित माहिती देण्याचे आवाहन नागरीक तथा सर्व वैद्यकीय व्यावसायिक यांना करण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.