Pimpri : विसर्जन मिरवणुकीस सुरुवात; घरच्या बाप्पांना निरोप देण्यासाठी घाटांवर गर्दी (व्हिडिओ)

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड शहरात गणेश विसर्जन मिरवणुकीस सुरुवात झाली. शहरातील सर्वच विसर्जन घाटांवर गणेश भक्तांनी गर्दी केली. मोठ्या मंडळांनी देखील विसर्जनास प्रारंभ केला आहे. ढोल ताशा, बँजोचा आवाज आणि ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ च्या जयघोषात सर्वजण आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देत आहेत.

ढोल-ताशांचा दणदणाट, फुलांची आणि भंडाऱ्याची केली जाणारी मुक्त उधळण, झांज पथकाचे रंगलेले खेळ, तरुणाईचा शिगेला पोचलेला उत्साह अशा जल्लोषमय वातावरणात पिंपरी परिसरातील गणेश मंडळ बाप्पाला निरोप देत आहेत. गणेश मंडळांनी ‘श्रीं’च्या रथाला आकर्षक सजावट केली होती. दुपारी साडेबारा वाजता जी. के. एन. सटर्ड कंपनी मित्र मंडळाने मिरवणुकीत सर्वप्रथम सहभाग घेतला. सायंकाळी सहा वाजेपर्यंत 22 मंडळांनी गणरायाला निरोप दिला. महानगरपालिकेतर्फे संत गाडगे महाराज चौक (कराची चौक) येथील स्वागतकक्षातून मंडळाच्या अध्यक्षांचा सत्कार करण्यात येत आहे.

विसर्जन घाटांवर महापालिकेच्या वतीने कृत्रिम विसर्जन हौद बांधण्यात आले आहेत. नागरिक त्या हौदामध्ये गणेश विसर्जन करण्यास पसंती देत आहेत. पोलीस बंदोबस्त, अग्निशमन दल आणि महापालिका कर्मचारी सर्व घाट आणि विसर्जन मार्गांवर कार्यरत आहेत.

दरम्यान, नदीपात्रात पाणी कमी असल्याने नदीपात्रात गाळ उघडा झाला आहे. गणपती विसर्जन करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या पथकाला गणपती विसर्जित करण्यासाठी अडचणी येत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.