Pimpri: संशोधनात निर्भयता हवी – डॉ. रामचंद्र देखणे

एमपीसी न्यूज – देशात विद्यापीठीय संशोधन करणा-यांची संख्या कमी होत आहे. संशोधनासाठी लेखन करताना निर्भयता हरवत चालली आहे. ज्यावेळी निर्भयता हरवते त्यावेळी संशोधन परिपूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे संशोधनासाठी निर्भयता हवी असते, असे प्रतिपादन संत आणि लोकसाहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांनी पिंपरी येथे केले.

पिंपरी-चिंचवड श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार विश्वास मोरे यांना पीएचडी जाहीर झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. त्यावेळी डॉ. मोरे यांना रामचंद्र देखणे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. संत तुकाराम महाराजांची मूर्ती, शाल, श्रीफळ, पगडी असे या सत्काराचे स्वरुप होते. यावेळी भंडारा डोंगर दशमी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब काशिद, संत तुकाराम महाराजांचे वंशज संभाजी महाराज मोरे, संघाचे अध्यक्ष सुनील लांडगे, उपाध्यक्ष अनिल कातळे आदी उपस्थित होते.

डॉ. देखणे म्हणाले, ” लोकजीवनावर, समाजजीवनावर संशोधन करताना संशोधकाला भीती वाटते. काही लिहल्यास कुठला समाज माझ्यावर खवळून उठेल की काय. मी अमुक एखादा संदर्भ दिल्यास माझ्यावर कुणी आघात करेल की काय, त्यामुळे अनेक संशोधक संशोधनापासून दुरावले गेलेत. संशोधकांना निर्भयता नाही. हे मोठं दुर्देव आहे. ज्यावेळी निर्भयता हरवते त्यावेळी संशोधन हे परिपूर्ण होऊ शकत नाही.

संशोधन चांगल्या पद्धतीने झाल्यास तितक्याच चांगल्या पद्धतीने प्रबंध लिहू शकतो. संपूर्ण भारतात, राज्यात संशोधनासाठी प्रचंड विषय आहेत. परदेशातील विद्यार्थ्यांना संशोधनासाठी विषय मिळत नाही. ही वस्तुस्थिती आहे. तरीही येथील लोक परदेशात का जातात हे कळत नाही. छोट्या गोष्टींमध्येही संशोधन करता येते. संशोधने हा विषय खूप आनंदाचा आहे. पत्रकार हा उत्तम संशोधक होऊ शकतो. शोध घेतल्यावर बातमी होते. आणि त्या बातमीवर संशोधन मूल्यांच्या आधारे काम केल्याने शोध प्रबंध होऊ शकतो. समाजातील विविध विषय संशोधनातून पुढे येण्याची गरज आहे.

डॉ. मोरे म्हणाले, “प्रत्येक पत्रकार हा संशोधक असतो. समाजात विविध घटना घडामोडींवर संशोधन होण्याची गरज आहे. त्यातून समाजाला दिशा मिळू शकते. लोककला आणि ललितकलांविषयी मोठ्याप्रमाणार संशोधनाची गरज आहे. संशोधनासाठी चिकाटी आणि कष्ट करण्याची तयारी असणे गरजेचे आहे”

उपाध्यक्ष अनिल कातळे यांनी प्रास्ताविक केले. पितांबर लोहार यांनी सूत्रसंचालन केले. तर आभार अरुण कांबळे यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.