BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : शहरात विठु नामाचा गजर; मंदिर परिसरात भाविकांना महाप्रसादाचे वाटप

0
INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – ‘तीर्थ विठ्ठल…क्षेत्र विठ्ठल…देव विठ्ठल..’, इंद्रायणी काठी… नामाचा गजर… अशा अनेकविध अविट गोडीच्या अभंगांच्या पार्श्वभूमीवर शहरातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आषाढीनिमित्त भाविकांनी गर्दी केली होती. मंदिरांमध्ये सुरू असलेली महापूजा… मंदिर परिसरात भाविकांना करण्यात येणारे खिचडी, फळे व अन्य महाप्रसादाचे वाटप…. असे उत्साहाचे वातावरण शुक्रवारी शहरात होते.

शुक्रवारी सकाळी शहरातील सर्वच विठ्ठल-रुक्मिणी मंदिरामध्ये मंत्रोच्चारात महाअभिषेक करण्यात आला.भाविकानी शुक्रवारी विठुरायाची मनोभावे पूजा केली. शहराच्या विविध भागातील मंदिरांमध्ये आषाढी एकादशी उत्साहात साजरी केली.

  • एकादशीमुळे शहरातील विठ्ठल मंदिरांमध्ये दिवसभर भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळाले. या प्रमुख मंदिरांसह उपनगरातील मंदिरांमध्ये पहाटेपासूनच भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. शहरातील विठ्ठलाची सर्व मंदिरे रंगरंगोटी, फुलांच्या रचना आणि रोषणाईने सजविण्यात आली होती. मूर्तीच्या गाभाऱ्यात फुलांच्या रचना सगळ्यांचेच लक्ष वेधून घेत होत्या. पाऊस उघडलेला असल्याने गर्दी वाढत गेली.

सर्व मंदिरांमध्ये पहाटे महापूजा करण्यात आली. दिवसभर कीर्तन-भजन आणि हरिपाठासह विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. काही मंदिरांमध्ये फराळाचा प्रसाद देण्यात आला. विविध भागांतील मंदिरामध्ये विठूरायाच्या दर्शनाला भाविकांनी जाणे पसंत केले. मंदिरांमध्ये टाळ-मृदुगांच्या गजरात भजन-कीर्तनाचे कार्यक्रमही रंगले होते. काही मंदिरांमध्ये आषाढीनिमित्त भक्तांना चहा, फराळाची सोय केली होती.

HB_POST_END_FTR-A1
.