Pimpri : दुपारी दोन पर्यंत जास्तीत जास्त मतदानाचा टक्का वाढवावा लागणार ! दुपारी व संध्याकाळी पावसाची शक्यता

एमपीसी न्यूज- परतीचा पाऊस महाराष्ट्रातून बाहेर पडला असे म्हटले जात असतानाच या पावसाने पुन्हा आपले अस्तित्व दाखवण्यास सुरुवात केली आहे. त्यातच राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. सोमवारी मतदान प्रक्रिया पार पडणार असतानाच येत्या दोन दिवस राज्यात पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. उद्या सोमवारी दुपारनंतर विजांच्या कडकडाटासह आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या सरी कोसळणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे दुपारी दोन वाजण्याच्या आतच जास्तीतजास्त मतदान करवून घ्यावे लागणार आहे.

राज्यात निवडणुकीची धामधूम सुरु असतानाच आता परतीच्या पावसाने धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. बंगालच्या उपसागरात ढगांची द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे, तसेच कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकण येथे बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर या विभागांमध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी पडतील, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात सोमवारपर्यंत, मध्य महाराष्ट्रात कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर येथे बुधवारपर्यंत, पुण्यात मंगळवारपर्यंत, मराठवाड्यात उस्मानाबाद, बीड येथे उद्या, सोमवारपर्यंत तर औरंगाबादमध्ये आज, रविवारी मेघगर्जना, विजा आणि जोरदार वाऱ्यांसह तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.

मागील चार-पाच दिवसांपासून दररोज पडत असलेल्या पावसाचा निवडणुकीच्या प्रचाराला फटका बसला आहे. पावसामुळे नेत्यांच्या प्रचारसभा रद्द कराव्या लागल्या तर उमेदवारांना भर पावसात प्रचार करावा लागला. पुण्यात राज ठाकरे यांची पहिली जाहीर सभा पावसामुळे रद्द करावी लागली तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना सातारा येथे भर पावसात सभा घ्यावी लागली. एकूणच पावसाळी वातावरणात निवडणुकीचा प्रचार शनिवारी संध्याकाळी 6 वाजता संपला. आता सर्वच उमेदवारांना उद्या सोमवारच्या मतदानाचे वेध लागलेले आहेत.

त्यातच हवामान खात्याने राज्याच्या अनेक भागात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केल्यामुळे मतदाराला मतदान कक्षापर्यंत आणण्याचे कष्ट सर्वच उमेदवार आणि निवडणूक विभागाला घ्यावे लागणार आहेत. सोमवारी दुपारी अंदाजे 2 वाजल्यानंतर पावसाला सुरुवात होणार असल्याचा अंदाज असल्यामुळे दोन वाजण्याच्या आत जास्तीतजास्त मतदान कसे करता येईल यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.