Pimpri: ‘वॉर्ड पद्धतीचा भाजपला फटका बसणार नाही, वॉर्ड पद्धतीचा फायदा होईल; विरोधक आशावादी

एक वॉर्ड पद्धतीचे राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना, मनसे, आरपीआयकडून स्वागत; भाजपची नापसंती

एमपीसी न्यूज – महाविकासआघाडी सरकारने महापालिकेच्या निवडणुकीतील प्रभाग पद्धत रद्द केली आहे. त्याऐवजी वॉर्ड पद्धत आणली असून एका वॉर्डातून एकच सदस्य निवडून येणार आहे. या निर्णयाचे राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना, मनसे, आरपीआयने स्वागत केले. तर, महापालिकेतील सत्ताधारी भाजपने नापसंती दर्शविली. पिंपरी महापालिकेची फेब्रुवारी 2022 मध्ये होणारी निवडणूक आता वॉर्ड पद्धतीने होईल. वॉर्ड पद्धतीच्या निर्णयावर ‘एमपीसी न्यूज’ने शहरातील नेत्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या असता महापालिकेतील सत्ताधा-यांनी नाराजी व्यक्त करत वॉर्ड पद्धतीचा भाजपला फटका बसणार नसल्याचे सांगितले. तर, विरोधकांनी स्वागत करत आगामी निवडणुकीत फायदा होण्याचा आशावाद व्यक्त केला.

भाजप सरकारने एका प्रभागात तीनपेक्षा कमी व पाचपेक्षा जास्त सदस्य नसतील अशी बहुसदस्यीय पद्धत आणली होती. त्यानंतर झालेल्या विविध महापालिका निवडणुकीत भाजपला यश मिळाले होते. बहुसदस्यीय पद्धतीला अनेकांचा विरोध होता. राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारने प्रभाग पद्धत रद्द केली आहे. आता वॉर्ड पद्धतीने निवडणूक होणार आहे. एका वॉर्डातून एकच सदस्य निवडून येणार आहे. एक सदस्यीय पद्धतीमुळे अनेकांना दिलासा मिळणार आहे. महापालिका अधिनियमातील सुधारणा विधेयकावर विधानसभेत शिक्कामोर्तब करण्यात आले.

शिवसेना खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, ”वॉर्ड पद्धतीमुळे नगरसेवकाला काम करण्यासाठी वाव मिळतो. चारच्या प्रभागामध्ये सर्वंच रामभरोसे राहते. कोणाचा कोणाला ताळमेळ नसतो. चार नगरसेवक एकमेकांवर जबाबदारी ढकलतात. वेगवेगळ्या पक्षांचे नगरसेवक असतात. त्यामुळे विकास रखडतो. वॉर्ड पद्धतीत नगरसेवक निवडून गेल्यावर तो आपल्या कामाचा ठसा उमठवू शकतो. नागरिकांच्या समस्या सोडवू शकतो. त्यामुळे वॉर्ड पद्धत चांगली आहे. ख-या काम करणा-या कार्यकर्त्यांला संधी मिळेल. शिवसेनाला देखील त्याचा फायदा होईल”.

आमदार, भाजप शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप :-  ”एक वॉर्ड पद्धतीचा निर्णय योग्य नाही. बहुसदस्यीय पद्धतीनेच निवडणूक गरजेची आहे. त्यामुळे सगळ्यांना निवडणूक लढविण्यास संधी मिळते. यामध्ये आरक्षण पडल्यास निवडणूक लढण्यास संधी मिळत नाही. वॉर्ड पद्धतीने निवडणूक झाली. तरी, भाजपला त्याचा फटका बसणार नाही. आम्ही कोणत्याही पद्धतीने निवडणुकीला सामोरे जाण्याची आमची तयारी आहे”.

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे :- ”एक वॉर्ड पद्धतीच्या निर्णयाचे स्वागत आहे. अतिशय चांगला निर्णय आहे. यापूर्वी द्विसदस्यी, तीन सदस्यी आणि चार सदस्यीय पद्धतीने निवडणूका झाल्या आहेत. बहुसदस्यी प्रभागामध्ये वेगवेगळ्या पक्षाचे नगरसेवक निवडून येतात. चारही एकाच विचाराचे असले. तरी, मतभेद होतात. अधिका-यांना काम करण्यास अवघड जाते.  त्यामुळे एक वॉर्ड पद्धतीचा निर्णय योग्य आहे. विकासकामांवर परिणाम होणार नाही. काम करण्यास सोपे जाईल. या निर्णयाचा महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला नक्तीच फायदा होईल. या निर्णयाबाबत राज्य सरकार आणि  अजितदादांचे आभार मानतो”.

काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे :-  ”वॉर्ड पद्धतीचा निर्णय स्वागातार्ह आहे. सत्तेचे विकेंद्रीकरण होऊन त्या-त्या भागातील विकास कामे करण्यासाठीच स्थानिक स्वराज्य संस्था निर्माण केल्या आहेत. बहुसदस्यीय प्रभाग रचनेत भौगोलिक संख्या देखील मोठी होती. चार नगरसेवकांची तोंडे वेगवेगळ्या दिशेने आहेत. त्यामुळे विकासकामे रखडतात. जनतेची नाहक हेळसांड होते. वॉर्ड पद्धतीत एकाला जबाबदार धरता येते. विकास चांगला करता येईल. निवडणुकीत काँग्रेसला प्रचंड फायदा होईल”.

मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले :- ”वॉर्ड पद्धतीचा उत्तम निर्णय सरकारने घेतला आहे. एक वॉर्ड एक सदस्य पद्धतीमध्ये चांगल्या प्रकारे कामे होतील. या निर्णयामुळे सर्वसामान्य कार्यकर्त्याला निवडणूक लढविणे सोपे जाईल. आगामी निवडणुकीत मनसेच्या नगरसेवकांची संख्या वाढेल”.

आरपीआय (आठवले गटा)च्या नेत्या चंद्रकांता सोनकांबळे :- “प्रभाग पद्धतीला आरपीआयचा सुरुवातीपासून विरोध होता. गरीब कार्यकर्ते, मागासवर्गीय समाजाचे, छोट्या पक्षांचे प्रतिनिधी प्रभागात निवडून येऊ शकत नव्हते. महापालिका निवडणुकीत तसे झाले.  आता छोट्या पक्षांचे, गरीब कार्यकर्ते निवडून येऊ शकतात. वॉर्ड पद्धत खूप चांगली आहे. वॉर्डाला नगरसेवक बांधील राहतो. आरपीआयच्या वतीने  महाराष्ट्र सरकारचे अभिनंदन करते”.

सभागृह नेते एकनाथ पवार :-  ”महापालिका निवडणुकीला दोन वर्षांचा अवधी आहे. निवडणुकीच्या अगोदर सहा महिने हा निर्णय बदलू शकतो. पुढच्या दोन वर्षांपर्यंत हे सरकार राहणार नाही”.

विरोधी पक्षनेते नाना काटे :-  ”वॉर्ड पद्धत सर्वांसाठी सोईचे आहे. काम करणे सोपे होईल.  एकच सदस्य असल्यामुळे वॉर्डचा चांगला विकास होईल. वॉर्ड पद्धतीचा राष्ट्रवादीला फायदा होईल. वॉर्डामध्ये ज्याचे काम, ताकद आहे तो निवडून येईल. लाटेवर निवडून आलेल्यांची वॉर्डात ताकद कळेल. या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो”.

शिवसेनेच्या शिरूर महिला जिल्हा संघटिका सुलभा उबाळे :-  ”प्रभाग पद्धतीत नागरिकांचे नुकसान होत आहे.  चार नगरसेवकांच्या वादामुळे विकासकामे रखडतात. प्रभाग मोठे असल्याने नगरसेवकांचे दुर्लक्ष होते. अधिकारी देखील त्यातून पळवाटा शोधतात. विकासकामे होत नाहीत. त्यामुळे वॉर्ड पद्धतीचा निर्णय स्वागातार्ह आहे. सत्तेचे विक्रेंदीकरण आवश्यक आहे. भाजपला एकहाती सत्ता ठेवण्याची सवय आहे. त्यामुळेच त्यांनी प्रभाग पद्धत केली होती. वॉर्ड पद्धतीचा आगामी निवडणुकीत शिवसेनेला फायदा होईल”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.