Pimpri: शहरात प्रभाग निहाय क्वारंटाईन सेंटर उभारावेत – विशाल वाकडकर

Ward wise quarantine center should be set up in the city - Vishal Wakadkar :मनपा रुग्णालयांमध्ये आयसीयू बेड व ऑक्सिजन बेडची संख्या वाढवावी.

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. जुलै, ऑगस्ट महिन्यात आणखी रुग्ण वाढण्याचा प्रशासनाचा अंदाज आहे. त्यामुळे आगामी काळात ही परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते. हे विचारात घेता शहरात प्रभाग निहाय क्वारंटाईन सेंटर उभारावेत, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष विशाल वाकडकर यांनी पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.

याबाबत महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात वाकडकर यांनी म्हटले आहे की, कोविड-19 या जागतिक महामारीचा सामना करण्यासाठी ‘डब्ल्यूएचओ’ आणि ‘आयसीएमआर’च्या मार्गदर्शक तत्वानुसार सरकार व पिंपरी चिंचवड महानगरपालिका नियोजन करीत आहे.

राज्यात सर्वप्रथम कोविड 19 चे रुग्ण पिंपरी चिंचवड शहरात मार्च महिन्यात आढळून आले. सुरुवातीला यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय आणि नवीन भोसरी रुग्णालय या ठिकाणी कोरोना रुग्णांवरील उपचार व क्वारंटाईन सेंटर सुरु करण्यात आले होते.

आजपर्यंत शहरात एकूण 13 ठिकाणी क्वारंटाईन सेंटर सुरु करण्यात आले आहेत. तरीदेखील उपलब्ध खाटांची संख्या रुग्णांच्या संख्येपेक्षा कमी आहे. त्यामुळे गंभीर लक्षणे असणा-या अनेक रुग्णांना उपचार मिळत नाहीत. अनेक रुग्ण होम क्वारंटाईन होत आहेत.

सलग तीन महिने व 14 जुलैपासून कडक लॉकडाऊन असतानाही शहरात कोविड रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गुरुवारपर्यंत (16 जुलै) शहरात 9 हजारांहून जास्त कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.

यापैकी एकूण 2337 हून जास्त रुग्ण उपचारार्थ विविध रुग्णालय व क्वारंटाईन सेंटरमध्ये दाखल आहेत. तसेच पिंपरी चिंचवड हद्दीतील 156 हून जास्त नागरिकांचा या महामारीत दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी जुलै महिनाअखेरपर्यंत कोविड रुग्णांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तविली आहे. त्यानुसार शहरात उपलब्ध असणारे कोविड क्वारंटाईन सेंटर कमी पडतील.

_MPC_DIR_MPU_II

यानंतर गंभीर परिस्थिती उद्‌भवण्याची शक्यता आहे. हे विचारात घेता शहरात प्रभाग निहाय क्वारंटाईन सेंटर उभारावेत.

यासाठी प्रत्येक प्रभागातील आवश्यकतेनुसार मनपा व खासगी शाळा, महाविद्यालये त्यांची वसतिगृहे, सार्वजनिक सभागृहे, समाज मंदिरे आणि मंगल कार्यालये खासगी कंपन्यांचे गोडाऊन, वेअर हाऊस ताब्यात घ्यावेत व तेथे क्वारंटाईन सेंटर उभारावेत.

तसेच यशवंतराव चव्हाण रुग्णालय, नवीन भोसरी रुग्णालय आणि जिजामाता रुग्णालय या तीन महापालिकेच्या रुग्णालयात आयसीयू व ऑक्सिजन बेडची व्यवस्था आहे. तशी व्यवस्था शहरातील इतर क्षेत्रीय कार्यालयांचा भौगोलिक विचार करता करण्यात यावी.

शहराच्या पश्चिम व उत्तर भागातील नागरिकांना आयसीयू सेवेसाठी यशवंतराव चव्हाण रुग्णालयावर अवलंबून रहावे लागते. याठिकाणी बेडची संख्या कमी असल्यामुळे नाईलाजास्तव रुग्णांना खासगी रुग्णालयात जावे लागते.

परंतू खासगी रुग्णालयेदेखील कोविड 19च्या या काळात बाधित रुग्णांना दाखल करून घेण्यास नकार देत असल्याचे दिसते.

नागरिकांची ही गैरसोय दूर करण्यासाठी आयुक्तांनी युद्ध पातळीवर शहरातील इतर मनपा रुग्णालयांमध्ये आयसीयू बेड व ऑक्सिजन बेडची संख्या वाढवावी.

तसेच शहरातील प्रत्येक प्रभागात किमान 100 रुग्णांना दाखल करता येईल, असे क्वारंटाईन सेंटर उभारावे, अशी मागणी वाकडकर यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.