Pimpri: आयुक्तांचा वेतन रोखण्याचा इशारा अन् ‘त्या’ कर्मचार्‍यांची धावाधाव

इतर सरकारी कार्यालयांमध्ये काम करणारे 'ते' कर्मचारी तातडीने महापालिका सेवेत रूजू

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका आस्थापनेवरील 43 कर्मचारी निवडणूक, सरकारी तसेच इतर निमसरकारी कार्यालयात नेमणुकीस असल्याचे लक्षात आल्यानंतर या सर्व कर्मचा-यांनी तात्काळ महापालिका प्रशासन विभागात रूजू व्हावे, असा आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिला होता. तसेच या कर्मचा-यांचे डिसेंबर महिन्याचे वेतन महापालिका सेवेत रूजू झाल्याशिवाय देण्यात येऊ नये, असेही त्यांनी निर्देशही दिले होते. वेतन रोखण्याचा आयुक्तांचा हा इशारा चांगलाच कामी आला असून, हे सर्व कर्मचारी महापालिका सेवेत तात्काळ रूजू झाले आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिका आस्थापनेवर कार्यरत असणारे काही कर्मचारी अन्य सरकारी कार्यालयांमध्ये काम करत आहेत. अशा कर्मचा-यांची माहिती महापालिकेने मागविली होती. त्यामध्ये महापालिका आस्थापनावरील 43 कर्मचारी इतर शासकीय कार्यालयात कार्यरत असल्याचे समोर आले. बहूतांशी महापालिका कर्मचा-यांच्या नियुक्त्या संबधित निवडणूक कार्यालयामार्फत तसेच प्रशासन विभागाकडील आदेशानुसार निवडणूक विभाग आणि अन्य सरकारी कार्यालयांमध्ये करण्यात आल्या आहेत. अशा कर्मचा-यांचे मासिक वेतन महापालिका कोषागरातून दिले जाते. हे कर्मचारी तात्पुरत्या कामासाठी वर्ग केले होते मात्र तरीही त्यानंतर महापालिका सेवेत रूजू झाले नाही.

गेल्या चार-पाच वर्षात महापालिका आस्थापनेवरील अधिकारी-कर्मचा-यांच्या संख्येमध्ये सेवानिवृत्ती, राजीनामा, मृत आणि इतर कारणांमुळे लक्षणीय घट झाली आहे. त्यातच अशाप्रकारे तात्पुरत्या शासकीय कामासाठी वर्ग केलेले कर्मचारी वेळोवेळी रूजू होत नसल्यामुळे नागरिकांची आणि प्रशासकीय कामे जलदगतीने होण्यासाठी मोठी गैरसोय होत असल्याचे आयुक्त हर्डीकर यांच्या लक्षात आले. त्यामुळे या सर्व कर्मचा-यांनी तात्काळ महापालिका प्रशासन विभागात रूजू व्हावे. असा इशारा आयुक्त हर्डीकर यांनी दिला होता. हे कर्मचारी रुजू न झाल्यास शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्यात येईल. या कर्मचा-यांचे डिसेंबर 2019 चे मासिक वेतन महापालिका सेवेत रूजू झाल्याशिवाय देण्यात येऊ नये असेही आयुक्तांनी सांगितले. वेतन रोखण्याचा इशारा समजताच हे कर्मचारी आपआपल्या विभागात रूजू झाले आहे.

याबाबत बोलताना प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त मनोज लोणकर म्हणाले, ”पिंपरी-चिंचवड महापालिका आस्थापनेवर कार्यरत असणारे काही कर्मचारी अन्य सरकारी कार्यालयांमध्ये काम करत आहेत. अशा कर्मचा-यांची माहिती महापालिकेने मागविली होती. त्यामध्ये महापालिका आस्थापनावरील 43 कर्मचारी आढळून आले मात्र, यामध्ये महिती न आढळलेले आणखी काही कर्मचारी होते. ते देखील महापालिका सेवेत आपल्या विभागात रुजू झाले आहेत. पन्नासहून अधिक कर्मचारी रुजू झाले आहेत”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.