एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतून वाहणाऱ्या पवना नदीतील जलपर्णी त्वरीत काढावी तसेच पावसाळ्यापूर्वी शहरातील रस्ता, नाले, ड्रेनेज व इतर आवश्यक कामे उरकून घ्यावी. शहरात पूरपरिस्थिती निर्माण करणाऱ्या या गोष्टींची गंभीर दखल घेऊन महापालिका आयुक्तांनी कामाचे आदेश द्यावेत अन्यथा राजीनामा द्यावा, अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनी केली आहे.

पवना नदीला दिवसेंदिवस जलपर्णीचा विळखा पडत आहे त्यामुळे नदीला मैदानाचे स्वरूप प्राप्त झाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांचे शहरातील इतर महत्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष होत आहे. रस्त्यातील खड्डे बुजवणे, नालेसफाई, ड्रेनेज सुरळीत करणे व पाण्याची गळती थांबवणे यासारखी कामे पावसाळ्यापूर्वी केली नाहीत तर शहराला गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा नाईक यांनी पिंपरी- चिंचवड आयुक्त श्रावण हर्डीकर यांना लिहिलेल्या पत्रात दिला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार लक्ष्मण जगताप यांच्याकडे स्वतंत्रपणे पाठविलेल्या निवेदनात नाईक म्हणतात की, महापालिका आयुक्त ऑनलाईन चॅट सेशनमध्ये जास्त व्यस्त दिसतात व शहरातील इतर महत्त्वाच्या बाबींकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे  अजित पवार यांनी पालकमंत्री या नात्याने या प्रकरणात लक्ष घालून आयुक्तांवर  सक्त कारवाई करून त्यांचे निलंबन करावे, अशी मागणी नाईक त्यांनी केली आहे.

दरम्यान, प्रदीप नाईक यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना लिहिलेल्या पत्रात खालील प्रमुख मागण्या केल्या आहेत.

# पवना नदी मधील जलपर्णी त्वरित काढावी व ती पुन्हा वाढणार नाही याची महापालिकेने दक्षता घ्यावी

# नद्यांमध्ये सोडले जाणारे सांडपाणी त्वरित बंद करावे तसेच नदीवर कपडे धुणार्‍यांवर कडक कारवाई करावी

# पावसाळ्यापूर्वी शहरातील पिण्याच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ धुऊन काढाव्यात

# शहरात ज्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची गळती होत आहे ती दुरूस्त करून पाणी पुरवठा सुरळीत करावा

# पंचरत्न काॅलनी मधील कमी झालेले पाण्याचे प्रेशर वाढवावे तसेच या काॅलनीमधील रस्त्यावरील खड्डे बुजवावे

# शहरात ठिकठिकाणी बांधलेले धोकादायक गतीरोधक काढून टाकावे