Pimpri : पवना धरणातील पाणीसाठा 20 टक्‍क्‍यांवर !

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागविणा-या पवना धरणातील पाणीसाठा झपाट्याने घटत आहे. आजमितीला धरणात 20.51 टक्के पाणीसाठा असून गतवर्षीच्या तुलनेत सात टक्के पाणीसाठा कमी आहे. पावसाने ओढ दिल्यास पाणी टंचाई सोसावी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.

मावळातील पवना धरणातून पिंपरी-चिंचवड शहर आणि मावळ परिसरातील भागाला पाणीपुरवठा केला जातो. रावेत बंधा-यातून पाणी उपसा करुन महापालिकेतर्फे शहरवासियांना पाणीपुरवठा केला जातो. यंदा धरण शंभर टक्के भरले. परंतु, परतीच्या पावसाने पाठ फिरविल्याने लवकरच धरणातून पाणी उपसा करण्याची वेळ आली. त्यातच तापमानाचा पारा उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच वाढता राहिला. त्यामुळे मोठ्‌या प्रमाणावर बाष्पीभवन झाले. पवना धरणात आजमितीला 20.51 टक्के पाणीसाठा असून हा साठा गतवर्षीपेक्षा 7 टक्के कमी आहे. हा पाणीसाठा 15 जूनपर्यंत पुरेल एवढा मर्यादित आहे.

आजअखेर पवना धरणात 20.51 टक्के (1973.40 फुट) पाणीसाठा शिल्लक आहे. धरणाची पाणी क्षमता 10 हजार दशलक्ष घनमीटर आहे. पाणी पातळी 1.75 दशलक्ष घनमीटर इतकी आहे. तर मागील वर्षी आजअखेर 27 टक्के (1978 फुट) इतका पाणीसाठा शिल्लक होता. गतवर्षाच्या तुलनेत 7 टक्के इतका पाणी साठा कमी शिल्लक आहे. तसेच पवना धरणातून दररोज नदीतून 1200 क्‍युसेसने 6 तास पाणी विसर्ग केला जात आहे.

पवना धरणाचे शाखा अभियंता ए.एम. गडवाल म्हणाले, ”पवना धरणात आजमितीला 20.51 टक्के पाणीसाठा असून गतवर्षीपेक्षा 7 टक्के हा पाणीसाठा कमी आहे. पावसाळा लांबण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. अशा परिस्थिती पाणीसाठा टिकविण्याचे आव्हान आहे. तीव्र उष्णतेमुळे मोठ्या प्रमाणावर बाष्पीभवन होत आहे. नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करणे गरजेचे आहे”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.