Pimpri : पवना धरणातून 4785 क्यूसेक तर खडकवासला धरणातून 18 हजार 491 क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग

नदीकाठच्या गावांना सावधनतेचा इशारा

एमपीसी न्यूज – गेल्या काही दिवसांपासून धरण क्षेत्रात सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे पवना आणि खडकवासला धरण भरली आहेत. पवना धरणातून 4785 क्यूसेक या वेगाने तर खडकवासला धरणातून 18 हजार 491 क्यूसेक पाणी नदीपात्रात सोडण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे पवना आणि मुठा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. खडकवासला धरणातून पाणी सोडण्यात आल्यामुळे पुण्यात बाबा भिडे पूल पाण्याखाली गेला आहे.

पिंपरी-चिंचवडकरांसह मावळवासियांची तहान भागविण्यारे पवना धरण ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात 100 टक्के भरले आहे. त्यामुळे शहरवासीयांसह मावळ परिसरातील नागरिकांचा वर्षभराचा पाण्याचा प्रश्न संपला आहे. एक जूनपासून 2774 मिमी पाऊस धरण परिसरात झाला आहे. गतवर्षी आजच्या तारखेला 2582 मिमी पाऊस झाला होता.

काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर गेल्या आठ दिवसांपासून धरण परिसरात पुन्हा पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे हायड्रो पॉवर आऊटलेटद्वारे नदीपात्रात पाणी सोडण्यात येत आहे. गेल्या 24 तासात 64 मिमी पाऊस धरण क्षेत्रात झाला असून पावसाचा जोर वाढला आहे. धरणात पाण्याचा यावा वाढला आहे. त्यामुळे आज (मंगळवारी) सकाळी साडेआठ वाजल्यापासून 4785 क्यूसेक या वेगाने नदीत पाणी सोडण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

‘पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. यामुळे येडसे-शिवली रस्ता पाण्याखाली जाईल. तसेच संबंधित यंत्रणांना आपल्या कार्यक्षेत्रातील नदी काठच्या गावांना सावधनतेचा इशारा देण्याच्या सूचना केल्या आहेत. पावसाची परिस्थती पाहून पाणी कमी-जास्त केले जाणार आहे’, अशी माहिती शाखा अभियंता ए.एम.गदवाल यांनी दिली.

दरम्यान, खडकवासला धरणातून पाणी सोडण्यात आल्यामुळे पुण्यातील बाबा भिडे पूल आणि नदीकाठचा रस्ता पाण्याखाली गेल्याने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गेल्या महिनाभराच्या खंडानंतर मान्सून पुन्हा सक्रिय झाला आणि खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होऊ लागली. खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील चारही धरणं सरासरी 95 टक्के इतकी भरली असून पावसाचा वेग कायम राहिला तर खडकवासला प्रकल्प ओव्हर फ्लो होऊ शकेल.

पाण्याखाली गेलेला बाबा भिडे पूल

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.