Pimpri : पाणी, नदी पुनरुज्जीवन, ई-बसेस, मेट्रो, रिंगरोड, रेडझोनचा प्रश्न मार्गी लावा; ‘पीसीसीएफ’ने केला पिंपरी-चिंचवडकरांचा जाहीरनामा प्रसिद्ध

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडकरांना भेडसावत असलेला पाण्याचा प्रश्न तातडीने सोडविण्यात यावा. पवना, आंद्रा-भामा आसखेड धरणातून पाणी उचलण्यात यावे. रेडझोन, रिंगरोड, पहिल्याच टप्प्यात निगडीपर्यंत मेट्रो नेण्यात यावी. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षमीकरणासाठी ई-बसेस, हवा प्रदूषण मापक व हवा शुद्धीकरण यंत्रांची संख्या वाढविण्या यावी. नदीचे पुनरुज्जीवन करावे. कचरा व्यवस्थापन कचरा विलगीकरण, कंपोस्टिगला सर्वोच्च प्राधान्य देण्याची मागणी व्यक्त करत शहराचा सर्वांगीण विकास करण्याची अपेक्षा शहरवासियांनी केली आहे.

पिंपरी-चिंचवड सिटिझन फोरमने (पीसीसीएफ) ‘नागरिकांचा जाहीरनामा’ तयार केला आहे. विधानसभा निवडणूक लढवित असलेल्या उमेदवारांनी जनतेच्या जाहीरनाम्याची अंमलबजावणी करावी, अशी अपेक्षा पीसीसीएफच्या पदाधिका-यांनी केली आहे.

स्मार्ट सिटी अंतर्गत शहरातील तीनही विधानसभा मतदारसंघात एकाचेवळी समतोल विकास साधण्यात यावा. पिंपळेसौदागर, पिंपळेगुरव प्रमाणे पिंपरी आणि भोसरी मतदारसंघातील परिसर देखील स्मार्ट सिटी अंतर्गत विकसित करण्यात यावा. महापालिका हद्दीबाहेरील लगतच्या गावांचा देखील समतोल विकास होणे आवश्यक आहे.

पवना आणि इंद्रायणी नदीखोऱ्यात उगमापासून नदी सुधार प्रकल्प न राबविता नदी पुनरुज्जीवन प्रकल्प राबविण्या यावा. पर्यटनाला चालना देण्यासाठी बोटिंग वॉटर स्पोर्टस इत्यादी सुविधा निर्माण कराव्यात. निळ्या पूररेषेची (ब्ल्यू लाइन) हद्द कमी करण्यात येऊ नये. नदी किनारी राडारोडा टाकण्यात येऊ नये याची दक्षता घेण्यात यावी. राडारोडा टाकणा-यांवर कडक कारवाई करावी.

नदी किनाऱ्यावरील गावांमध्ये मैलाशुद्धीकरण प्रकल्प उभारावेत. औद्योगिक कंपन्यातील रसायनमिश्रीत पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी स्वतंत्र पाणी शुद्धीकरण केंद्र बांधण्यात यावेत. प्रक्रियायुक्त पाणी नदीत न सोडता त्याचा पुर्नवापर करावा. मैलाशुद्धीकरण केंद्रावर 24 तास वीज पुरवठा करावा. शहराचे पर्यावरण व जैवविविधता व्हिजन तयार करावे. अवैध वृक्षतोडीवर कडक कारवाई करण्यात यावी. सार्वजनिक कार्यालयांवर सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करावेत. ई-वाहनांचा वापर वाढविण्यात यावा.

शहरात चार्जिंग स्टेशन, बॅटरी एक्सचेंज केंद्रे करावीत. जागतिक तापमानवाढ आणि हवामान बदलाकडे देखील जाहीरनाम्यात भर देण्यात आला आहे. माफक दरात वीजपुरवठा आणि पाणीपुरवठा करावा. प्रत्येक प्रभागात दिल्लीच्या धर्तीवर मोहल्ला क्लिनिक सुरु करण्यात यावे, अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे.

शहरातील वाहतूककोंडीचा प्रश्न मार्गी लावावा. त्यासाठी विकास आराखड्याची तातडीने अंमलबजावणी करावी. निगडी, वाकड आणि वल्लभनगर या ठिकाणी मल्टीमोडल ट्रान्सपोर्ट हब निर्माण करावेत. शहरातील गर्दीच्या ठिकाणी सार्वजनिक स्वच्छागृहांची संख्या वाढवावी. स्वच्छतागृहांची देखरेख आणि साफसफाई नियमित व्हावी.

भूजल व्यवस्थापनासाठी मुख्यत्वे शासकीय कार्यालयासह संपुर्ण शहरात ‘रिचार्च व्होल्ज’ निर्माण करावेत. त्यासाठी नागरिकांना देखील प्रोत्साहित करावे. तीनही विधानसभा मतदारसंघात अत्याधुनिक सुविधायुक्त क्रीडा केंद्र असावे. शहरात स्पोर्ट्रर्स युनिर्व्हसिटी निर्माण करावी. पिंपरी-चिंचवड शहरासह राज्यात आकसमित हवामान बदल आणि नैसर्गिक आणीबाणी जाहीर करावी.

पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण हद्दीतील जमीन अधिग्रहण प्रभावित्यांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करणे, प्लॉट फ्रीहोल्ड करणे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला रेडझोनचा प्रश्न निकालात काढावा. शहरात कोणत्याही स्वरूपातील नवीन बेकायदा बांधकामे होऊ देऊ नयेत. त्यासाठी दक्षता घेण्यात घ्यावी, अशी अपेक्षा नागरिकांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.