Pimpri: पाणी कपातीचे संकट कायम; धरणात केवळ 46 टक्के पाणीसाठा

पवना धरणातील पाणीसाठा यंदा निम्याने कमी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडकरांसह मावळवासियांची तहान भागविणा-या पवना धरणात केवळ 46.54 टक्के पाणीसाठा झाला आहे. गतवर्षीपेक्षा निम्म्याने म्हणजेच 44.11 टक्यांनी पाणीसाठा कमी आहे. गतवर्षी आजच्या तारखेला धरणात 90.65 टक्के पाणीसाठा होता. गेल्या दहा दिवसात धरण पाणलोटक्षेत्रात शून्य टक्के पाऊस नोंदविण्यात आला आहे. त्यामुळे शहरवासियांवरील पाणी कपातीचे संकट कायम राहणार असल्याची चिन्हे आहेत.

मावळसह पिंपरी-चिंचवड शहराची पवना धरणावर भिस्त आहे. गतवर्षी ऑगस्ट महिन्यातच धरण शंभर टक्के भरले होते. त्यानंतर पाऊसाने दडी मारली. तर, परतीच्या पावसाने हुलकावणी दिली होती. त्यामुळे लवकरच नदीऐवजी धरणातून पाणी उचलावे लागले होते. तीव्र उन्हाळ्यामुळे पाण्याचे मोठ्या प्रमाणावर भाष्पीभवन झाले. परिणामी, यंदा पहिल्यांदाच धरणातील पाणीसाठा सर्वांत कमी म्हणजेच 13 टक्यांवर आला होता. महापालिकेने 1 मार्च 2019 पासून विभागनिहाय एकदिवस पाणीपुरवठा बंद केला होता. तरी, देखील पाण्याच्या तक्रारी येत होत्या. त्यामध्ये वाढ करत 6 मे पासून एकदिवसाआड पाणीपुरवठा सुरु केला आहे.

  • जून महिना सुरु झाल्यानंतर जोरदार पाऊस सुरु होऊन पाणी कपातीपासून दिलासा मिळेल, अशी शहरवासियांना अपेक्षा होती. परंतु, पावसाने ओढ दिली. जूनच्या शेवटच्या आठवड्यात मॉन्सूनचे आगमन झाले. जुलैच्या पहिल्या आठवड्यात ब-यापैकी पाऊस झाला. त्यामुळे धरणातील पाणीसाठा 46 टक्क्यांपर्यंत पोहचला. परंतु, गेल्या दहा दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची नोंदच झाली नाही. त्यामुळे पाणीकपात कायम ठेवण्यात येणार आहे. तुर्तास मागे घेतली जाणार नसल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे.

पवना धरणाचे शाखा अभियंता ए.एम.गदवाल म्हणाले, ”पवना धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासांत शून्य टक्के पावसाची नोंद झाली आहे. 1 जूनपासून धरणक्षेत्रात 1130 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणातील पाणीसाठा 46.54 टक्के आहे. गतवर्षी आजमितीला धरणात 90.65 टक्के पाणीसाठा होता. गतवर्षीच्या तुलनेत यंदाचा पाणीसाठा निम्म्याने कमी आहे. त्यामुळे पाण्याचा काटकसरीने वापर करणे गरजेचे आहे. पिंपरी-चिंचवडकारांचा पाणीपुरवठा पुर्ववत करण्यासाठी धरण किमान 80 टक्क्यांपर्यंत भरणे गरजेचे आहे”.

  • आजमितीला काय आहे धरणातील स्थिती?
    गेल्या 24 तासात 00 मिमि पाऊस.
    1 जूनपासून झालेला पाऊस 1130 मिमि.
    धरणातील आजचा पाणीसाठा 46.54 टक्के.
    गतवर्षीचा आजच्या तारखेचा पाणीसाठा 90.65 टक्के.
    1 जूनपासून धरणातील पाणीसाठ्यात झालेली वाढ 32.08 टक्के.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.