Pimpri : पवना धरणातील पाणीसाठ्यात वाढ; पाणी कपात रद्द करा -श्रीरंग बारणे

खासदार श्रीरंग बारणे यांची आयुक्त यांना सूचना

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडकरांना पाणीपुरवठा करणा-या मावळातील पवना धरणात 37 टक्के पाणीसाठा झाला आहे. पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस पडत आहे. त्यामुळे पाणीकपात रद्द करून शहरवासीयांना दररोज पाणी देण्यात यावे, अशी सूचना शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी महापालिकेला केली आहे.

याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. त्यात खासदार बारणे यांनी म्हटले आहे, महापालिका सध्या थेट पवना नदीपात्रातून पाणी उचलते. दिवसाला 440 ते 480 एमएलडी पाणी उचलून शहरवासियांना पाणीपुरवठा केला जातो. पाऊस चांगला पडत असल्याने पवना नदी दुथडी भरुन वाहत आहे. तसेच पवना धरणातील पाणीसाठा 37 टक्के झाला आहे. तरी, देखील दिवसाआड पाणीपुरवठा सुरुच ठेवला आहे. शहरविसायांना मुबलक पाणी मिळत नाही.

पावसाळा असूनही शहरातील अनेक भागातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे दिवसाआड पाणीपुरवठा रद्द करण्यात यावा. शहरातील नागरिकांना दररोज पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी खासदार बारणे यांनी निवेदनातून केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.