Pimpri: निरगुडी गावाला टँकरद्वारे पाणी; सहा लाखाचा वाढीव खर्च

एमपीसी न्यूज – च-होली मैलाशुद्धीकरण केंद्राच्या पाण्यामुळे विहीरीतील पाणी दूषित झाल्याने निरगुडी गावासाठी पिंपरी महापालिकेमामार्फत टँकरद्वारे पाणी पुरविण्यात येत आहे. मात्र, गावाने पाण्याची टाकी बांधली आहे. त्यासाठी हे पाणी पुरविण्याकरिता सहा लाखाचा वाढीव खर्च होणार आहे. त्यामुळे मूळ निविदा 14 लाख रूपये आणि वाढीव 5 लाख 99 हजार रूपये अशा एकूण 20 लाख रूपये सुधारीत खर्चास सोमवारी झालेल्या महापालिका स्थायी समिती सभेत आयत्या वेळी मंजुरी देण्यात आली.

निरगुडी गावाला पाणीपुरवठा करणारी सार्वजनिक विहीर ही इंद्रायणी नदीलगत आहे. या ठिकाणी च-होली मैलाशुद्धीकरण केंद्राचे पाणी वाहून येणारे पाणी विहीरीत झिरपत असल्याने विहीरीतील पाणी दूषित झाले आहे. त्यामुळे ते पिण्यासाठी वापरणे अयोग्य आहे. निरगुडी गावासाठी महापालिकेकडून पिण्याचे पाणी मिळण्यासाठी मागणी केली होती. त्यानुसार, महापालिकेने निरगुडी गावासाठी प्रतिदिनी एक लाख लिटर पाणी नऊ रूपये प्रति एक हजार लिटर या दराने देण्यास मान्यता दिली. तसेच महापालिकेकडे अतिरिक्त पाणी उपलबध नसल्याने त्यांना सुमारे 40 हजार लिटर पिण्याचे पाणी आंद्रा व भामा आसखेडचे प्रकल्प पूर्ण होईपर्यंत टँकरद्वारे देण्याबाबत मान्यता दिली.

निरगुडी ग्रामपंचायतीने पाणी साठविण्यासाठी स्वतंत्र टाकीचे बांधकाम केले आहे. महापालिकेने या टाकीत टँकरने पाणीपुरवठा करावा, यासाठी ग्रामपंचायतीने 20 जुलै 2018 रोजीच्या पत्रानुसार मागणी केली आहे. महापालिकेचे निरगुडी येथे टँकरद्वारे पाणी पुरविण्याचे स्वतंत्र काम नाही. हे काम ई प्रभागात टँकरने ठिकठिकाणी पाणीपुरवठा करणे या कामातून केले जाते. त्यामुळे या कामामधून निरगुडी येथे टँकरने पाणी पुरवावे लागणार आहे.

निरगुडी गाव पाणी भरावयाच्या गवळीमाथा पंपिंग स्टेशन या ठिकाणापासून सुमारे 14 किलोमीटर दूर आहे. त्यामुळे शेवाळेवाडी गावासाठी मंजुर केलेल्या 1100 रूपये प्रति ट्रीप या दरानुसार दर द्यावा लागणार आहे. या कामासाठी वाढीव 5 लाख 99 हजार रूपये खर्चास मान्यता द्यावी लागणार आहे. टँकरद्वारे दररोज पाणी पुरवायचे असल्याने कालावधी निश्चित नाही. त्यानुसार, निरगुडी गावास टँकरने पाणी पुरविण्यास 1100 रूपये प्रति ट्रीप दरास मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे मूळ निविदा 14 लाख रूपये आणि वाढीव 5 लाख 99 हजार रूपये अशा एकूण 20 लाख रूपये सुधारीत खर्चास सोमवारी झालेल्या महापालिका स्थायी समिती सभेत आयत्या वेळी मंजुरी देण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.