Pimpri: पाणी उपसा अन् शुद्धीकरणाची क्षमता वाढविणार, पण तूर्त दिवसाआडच पाणीपुरवठा; आयुक्त श्रावण हर्डीकर यांची माहिती

एमपीसी न्यूज – पवना धरणात मुबलक पाणीसाठा आहे. परंतु, महापालिकेची पाणी उचलण्याची आणि शुद्ध करण्याची क्षमता मर्यादित आहे. रावेत बंधा-यातून पाणी उपसा करण्याची क्षमता आणि निगडीतील जलशुद्धीकरण केंद्रातील प्रक्रिया करण्याची क्षमता वाढविण्यास प्राधान्य देत आहोत. त्याच्या निविदा प्रसिद्ध केल्या आहेत. जोपर्यंत पाणी उचलणे आणि शुद्धीकरणाची क्षमता वाढत नाही, तोपर्यंत दिवसाआडच पाणीपुरवठा सुरु राहील. त्याला पावसाळा देखील उजाडेल किंवा त्यापुढे देखील कालावधी लागेल. त्यानंतरच दररोज पाणीपुरवठा केला जाईल, अशी माहिती आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली.

आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आज (बुधवारी) पत्रकारांशी संवाद साधला. महापालिकेला पवना धरणातून प्रतिदिन केवळ 420 एमएलडी पाणी उपसा करण्याची परवानगी आहे. त्यापुढील पाण्यासाठी महापालिका दंड भरते. धरणात जादा पाणी उपलब्ध असल्यावर दंड भरुन महापालिकेला जादा पाणी दिले जाते. पवना नदीतून रावेत बंधारा येथील पालिकेच्या अशुद्ध जलउपसा केंद्रातून पाणी उचलले जाते. रावेत पंपगृहातील 19 पंप 24 तास चालू आहेत. त्यासाठी पंपिंगची क्षमता वाढविण्यात येणार आहे.

जुने पंप काढून मोठ्या क्षमतेचे नवीन 16 पंप टाकले जाणार आहेत. त्याची निविदा प्रसिद्ध केली आहे. तसेच सेक्टर 23 येथील जलशुद्धीकरण केंद्रात सध्या 500 एमएलडी पाण्यावर प्रक्रिया केली जावू शकते. या क्षमतेत देखील 580 एमएलडीपर्यंत वाढ करण्यात येणार आहे. वीजेचा भार देखील वाढवून घेतला जाणार आहे. 100 एमएलडी अधिकचे पाणी निर्माण करण्याची क्षमता करत आहोत. त्यानंतरच दररोज पाणीपुरवठा केला जाईल, असे आयुक्त हर्डीकर यांनी सांगितले.

पुणे महापालिकेचे आंद्रा-भामा आसखेड प्रकल्पाचे काम वेगात सुरु आहे. त्यांचे काम पुर्ण झाल्यावर वाघोली ग्रामीण पाणीपुरवठा योजना मंजुर कोट्यासह पिंपरी महापालिकेस हस्तांतरीत केल्यानंतर शहराचा दैनंदिन पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी आवश्यक असलेले 30 एमएलडी पाणी उपलब्ध होईल. त्यानंतर सुद्धा दररोज पाणीपुरवठा करता येऊ शकेल.

तसेच देहू बंधा-यातून 100 एमएलडी पाणी उचलण्यात येणार आहे. चिखलीतील जलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया करुन पाणीपुरवठा करता येईल. याबाबत देहुतील ग्रामपंचायतीच्या पदाधिका-यांशी चर्चा झाली आहे. महापालिका देहूला होणा-या पाणीपुरवठ्यावर प्रक्रिया करण्यासाठी मदत करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.