Pimpri : आम्हाला शास्तीची धास्ती – लक्ष्मण जगताप 

एमपीसी न्यूज – आम्हाला कशाची भिती नाही, फक्त शास्तीकराची धास्ती आहे. शास्तीकर माफ करुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तेवढी धास्ती घालवावी, अशी विनंती भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी केली. तसेच शास्तीसह, रेडझोन, पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी केली.

चिंचवड येथील झालेल्या सभेत ते बोलत होते. आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे दोघेही लोकसभेसाठी इच्छूक असून निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे दोघांना पण शास्तीकराची धास्ती घेतली आहे. विरोधक शास्तीकर माफीवरुन सत्ताधा-यांवर हल्ला करत असून निवडणुकीत शास्तीचा मुद्दा ऐरणीवर येण्याची दोन्ही आमदारांना धास्ती असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळेच त्यांनी शास्तीची धास्ती  घालविण्याची विनंती मुख्यमंत्र्यांना केली आहे.

लक्ष्मण जगताप म्हणाले, ”पिंपरी-चिंचवड शहरासाठी जे मागितले ते मुख्यमंत्र्यांनी शहरात आल्यावर दिले आहे. त्यांचे शहरावर प्रेम आहे. शहरातील प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केला आहे. मुख्यमंत्र्यांनी गतकाळात शहरावर लक्ष ठेवले असून भविष्यात लक्ष ठेवतील”.

पालकमंत्री गिरीश बापट यांचे केवळ पुण्यावर प्रेम आहे असे विरोधक म्हणतात असा उपरोधिक टोला लगावत आमदार जगताप म्हणाले, बापट यांचे पिंपरी-चिंचवडरही प्रेम आहे. त्यांच्यामुळेच शहराचा स्मार्ट सिटीमध्ये समावेश झाला आहे.

गेल्या 20 वर्षात जेवढी विकास कामे झाली नाहीत. तेवढी दीड वर्षात केली आहेत. समाविष्ट गावांचा कायापालट केला जात आहे असे सांगत आमदार महेश लांडगे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शहरावर आणि भोसरीवर जास्त प्रेम आहे. त्यामुळे ते शहरात आल्यावर आणि त्यांच्याकडे काही न मागितल्यावर योग्य होणार नाही. कारण, प्रत्येकवेळी जे मागितले ते त्यांनी दिले आहे. शास्तीकराचे काय होणार याची शहरवासियांना चिंता आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी शास्तीकराबाबत तेवढा निर्णय घ्यावा, अशी विनंती त्यांनी केली.

महापौर राहुल जाधव म्हणाले, गेल्या 20 वर्षात जेवढा विकास झाला नाही, तेवढा दीड वर्षात झाला असून शहरात विकासाची गंगा वाहत आहे. पिंपरी-चिंचवड औद्योगिकनगरी असून गोरगरिबांचे शहर आहे. शहरातील नागरिकांना शास्तीकर, अनधिकृत बांधकामे या प्रश्नांमुळे झोप येत नाही. त्यामुळे शास्तीकरातून शहरवासियांना मोकळे करा, पवना बंदिस्त जलवाहिनीचा प्रश्न मार्गी लावा, असे साकडे त्यांनी मुख्यमंत्र्यांना घातले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.