Pimpri: ‘आम्ही तुमची काळजी घेत आहोत, तुम्ही स्वतःची काळजी घ्या’; महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांचे आवाहन

पाच हजार स्वछतादूत करत आहेत शहराची स्वछता

एमपीसी न्यूज – कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी स्वच्छता ही महत्त्वाची आहे. नागरिक आपल्या घरी असताना महापालिका, कंत्राटी असे पाच हजार स्वछता कर्मचारी मात्र आपल्या सुरक्षिततेसाठी अहोरात्र काम करत आहेत. आपली काळजी घेत आहेत. दररोजचा शहरातील कचरा उचलणे, झाडलोट, सार्वजनिक स्वछतागृहांची साफसफाई, औषध फवारणीची कामे करत आहेत. अशा परिस्थितीतही काम करणाऱ्या या स्वछता दुतांचे करावे तेवढे कौतुक कमी आहे. ‘आम्ही तुमची काळजी घेत आहोत, तुम्ही स्वतःची काळजी घ्या’ असे आवाहन महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांकडून केले जात आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचे 12 ‘पॉझिटीव्ह’ रुग्ण आढळले आहेत. परदेशातून पिंपरी-चिंचवड शहरात आलेले तब्बल 1100 नागरिक ‘होम क्वॉरनटाईन’मध्ये आहेत. कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी स्वच्छता अतिशय महत्त्वाची आहे. या परिस्थितीत देखील महापालिकेचे स्वछता कर्मचारी काम करत आहेत.

संपूर्ण शहराची झाडलोट केली जात आहे. दररोज शहर स्वच्छ केले जात आहे. घरोघरचा कचरा दररोज गोळा केला जात आहे. दररोज कचरा गोळा करून मोशी डेपोत नेला जात आहे. संपूर्ण शहरात औषध फवारणी केली जात आहे.

पिंपरी-चिंचवडमधील ज्या भागामध्ये कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. त्या भागातील घरांमध्ये सर्वेक्षण करण्यात येत आहे. तसेच त्या भागात संपूर्ण परिसराची फवारणी केली जात आहे. एखाद्या सोसायटीमध्ये पॉझिटिव्ह रुग्ण आढळला तर त्या संपूर्ण इमारतीची फवारणी केली जाते.

घरांचे र्निजंतुकीकरण करण्यात केले जात आहे. होम क्वारंटाईन’ करण्यात आलेल्या व्यक्तींच्या रहिवासी जागेची तसेच आजूबाजूचा परिसराचे निर्जंतुकीकरण केले जात आहे. स्वच्छता कर्मचारी आपली काळजी घेत आहेत. त्यामुळे स्वछता दुतांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय म्हणाले, महापालिकेचे, कंत्राटी कर्मचारी, चालक असे 5 हजार स्वछता कर्मचारी कामावर आहेत. दररोजचा कचरा उचलणे, झाडलोट, औषध फवारणीची कामे केली जात आहेत. शहराच्या आरोग्याची दक्षता हे कर्मचारी घेत आहेत.

या कर्मचाऱ्यांचे करावे तेवढे कौतुक कमी आहे. कर्मचाऱ्यांच्या स्वच्छतेची दक्षता घेतली आहे. मास्क, ग्लोज, सॅनिटायझर, साबण दिली आहे. लांब घर असणाऱ्या कर्मचाऱ्यांना जवळच्या परिसरात काम करण्याची मुभा दिली आहे. हॉटेल बंद असल्याने कचरा कमी आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.