Pimpri: ….तर उपमहापौरांच्या फलकांवर कारवाई करणार – आयुक्त हर्डीकर

महापालिकेचे फ्लेक्‍स धोरण लवकरच आणणार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराचे उपमहापौर सचिन चिंचवडे यांनी वाढदिवसानिमित्त लावलेले फलक अधिकृत आहेत. काही फलक अनधिकृत असल्यास त्याची चौकशी केली जाईल. त्यानंतर त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचा इशारा, आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिला आहे. दरम्यान, राष्ट्रवादीच्या हल्लाबोल कार्यक्रमाचे पिंपळे गुरव येथील फ्लेक्‍स बेकायदेशीर ठरवत ते कार्यक्रमापूर्वीच तात्काळ काढून टाकण्याची तत्परता महापालिका प्रशासनाने काही दिवसांपूर्वी दाखविली होती. परंतु, सत्ताधा-यांचे फलक काढण्यास विलंब करत प्रशासन दुटप्पी करत असल्याचा आरोप विरोधक करत आहेत.

राष्ट्रवादीच्या हल्लाबोल आंदोलनाचे पिंपळेगुरव येथे फ्लेक्‍स लावण्यात आले होते. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते. मात्र, त्याचदिवशी सकाळी हे सर्व फ्लेक्‍स अनधिकृत असल्याचा दावा करत, फ्लेकस हटविण्यात आले होते. हे सर्व फ्लेक्‍स अधिकृत असल्याचा दावा राष्ट्रवादीने केला होता. या कारवाईमुळे महापालिकेच्या तत्परतेचीदेखील चांगलीच चर्चा रंगली होती.

या पार्श्‍वभूमीवर आयुक्त श्रावण हर्डीकर यांना विचारले असता, उपमहापौर सचिन चिंचवडे यांचे शहरातील फ्लेक्‍स अनधिकृत असल्याची बाब मला माहीत नाही. मात्र, हे फ्लेक्‍स अनधिकृत असल्यास, ते तात्काळ हटविण्यात येथील, असे त्यांनी सांगितले. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील बहुतांश फ्लेक्‍स अनधिकृत आहेत. त्यामुळे लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. त्यासाठी फ्लेक्‍स व होर्डींग्जबाबतचे नवे जाहिरात धोरण महापालिका आणणार आहे. त्यानुसार शहरातील फ्लेक्‍सला मंजुरी, त्यांचा आकारमान, दोन फ्लेक्‍समधील अंतर, नियंत्रण या सर्व बाबींचा समावेश असणार आहे. त्यामुळे शहरातील अनधिकृत फ्लेक्‍सच्या संख्येला चाप बसणार आहे, असेही ते म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.