Pune : प्लाझ्मा थेरेपी नक्की काय आहे; त्याने खरंच कोरोनाचा रुग्ण बरा होतो का?

एमपीसी न्यूज – राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी रात्री राज्याला संबोधित करताना राज्यात कोरोनाच्या रुग्णांवर ‘प्लाझ्मा थेरेपी’ आणि ‘बीसीजी’च्या उपचार करण्याची परवानगी केंद्र सरकारकडे मागणी केल्याचा उल्लेख केला. देशात प्रथम केरळमध्ये या प्लाझ्मा थेरपीचा  कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी वापर करण्यात आला. मुंबईच्या नायर रुग्णालयात एका कोविड -19 रुग्णांचे रक्त याच चाचणीसाठी घेण्यात आले आहे. तर ही प्लाझ्मा थेरेपी नक्की काय आहे आणि त्याने खरंच कोरोनाचा रुग्ण बरा होतो का? 

कन्व्हेलेसेंट प्लाझ्मा थेरेपी म्हणजे काय ? 

जेव्हा एखादा विषाणू आपल्या शरीरामध्ये प्रवेश करतो तेव्हा त्याच्याविरोधात लढण्यासाठी आपले शरीर प्रथिने तयार करते त्यांना ‘अॅन्टीबॉडी’ असे म्हणतात. ज्या व्यक्तीला संक्रमण झाले आहे ती व्यक्ती जर  पुरेशा प्रमाणात अॅन्टीबॉडी तयार करू शकत असेल तर, तो रुग्ण त्या विषाणूशी यशस्वी लढा देऊ शकतो.  प्लाझ्मा थेरेपी मागील थोडक्यात संकल्पना अशी आहे की, ज्या निरोगी व्यक्तीची प्रतिकारशक्ती चांगली आहे त्या व्यक्तीच्या रक्तातून प्लाझ्मा वेगळा करून तो संक्रमित व्यक्तीकडे हस्तांतरित केला जातो व त्या रुग्णाची प्रतिकारशक्ती वाढवली जाते.

कोरोना रुग्णाच्या बाबतीत, जो रुग्ण कोरोना या आजाराशी यशस्वी लढा देऊन बरा झाला आहे व त्या व्यक्तीची 14 दिवसानंतर कोरोना चाचणी दोन वेळा निगेटिव्ह आली आहे. अशा व्यक्तीचे रक्त घेऊन त्याच्यातून प्लाझ्मा वेगळा केला जातो व संक्रमित रुग्णाला हा प्लाझ्मा हस्तांतरीत केला जातो. थोडक्यात संक्रमित व्यक्तीची विषाणूशी लढण्याची प्रतिकारशक्ती वाढवली जाते व त्यामुळे रुग्ण लवकर बरा होण्यास मदत होते. एका व्यक्तीपासून घेतलेल्या रक्ताच्या प्लाझ्मा तून चार कोरोना रुग्णांचा उपचार केला जाऊ शकतो.

अमेरिका व चीनमध्ये यशस्वी वापर

चीनमध्ये या थेरपीचा यशस्वी वापर केला जात आहे. अमेरिकेने सुद्धा या थेरपीचे महत्त्व लक्षात घेऊन क्लिनिकल ट्रायल ला सुरुवात केली आहे, तसेच ब्रिटिश पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांचासुद्धा याच थेरपीच्या मदतीने उपचार करण्यात आला असून ते ठणठणीत बरे झाले आहेत.

भारतात केरळमध्ये पहिल्यांदा चाचणी

भारतातील आयसीएमआरने पहिल्यांदा केरळ या राज्याला प्लाझ्मा थेरपीची चाचणी करण्याची परवानगी दिली आहे. केरळ येथील श्री चित्र तिरुनल इन्स्टिट्यूट फॉर मेडिकल सायन्सेस अँड टेक्नॉलॉजी येथे या थेरपीची चाचणी करण्यात आली. त्यापाठोपाठ महाराष्ट्राने सुद्धा केंद्राकडे अशी चाचणी करण्यासाठी परवानगी मागितली आहे.

सार्स, इबोला आणि एच1एन1 यांच्या उपचारासाठी याच थेरपीचा वापर

यापूर्वी आलेल्या सार्स, इबोला आणि एच1एन1 या सारख्या साथीच्या आजारांच्या उपचारासाठी याच थेरपीचा यशस्वी वापर केला गेला होता. तसेच कोरोना या आजाराच्या पार्श्वभूमीवर सुद्धा रोगप्रतिकारक शक्तीची महत्वपूर्ण भूमिका असल्यामुळे प्लाझ्मा थेरपीचा पुन्हा एकदा वापर करण्याबद्दल वैद्यकीय विश्वात चर्चा सुरू आहे.

कोणत्या व्यक्तीचा प्लाझ्मा घेतला जाऊ शकतो?

आता या थेरपीसाठी कोणत्या व्यक्तीच्या रक्तातील प्लाझ्मा घेतला जाऊ शकतो तर जो व्यक्ती कोरोना या आजारातून यशस्वी लढा देऊन मुक्त झाला आहे. एवढेच नव्हे तर तो खालील चारीही गोष्टींची योग्य पूर्तता करतो त्याच व्यक्तीचे रक्त घेतले जाऊ शकते.

1) त्या व्यक्तींनी कोविड-19 या आजाराशी यशस्वी लढा दिला आहे व ठणठणीत बरा झाला आहे

2) आजारातून बरा झालेल्या  व्यक्तीची 14 दिवसानंतर दोन वेळा कोविड-19 ची चाचणी निगेटिव्ह आली आहे

3) आजारातून मुक्त झालेल्या व्यक्तीने मागच्या तीन महिन्यात कोणताही परदेश दौरा केलेला नसावा

4) आणि आणि बरा झालेल्या व्यक्तीला ताप आणि कोणताही श्वसनाचा विकार नसावा

प्लाझ्मा थेरपीमुळे ‘कोरोना’चा रुग्ण 100% बरा होतोच का?

वैद्यकीय अभ्यासानुसार प्लाझ्मा थेरपी च्या वापरामुळे कोरोनाचा रुग्ण शंभर टक्के बरा होईलच, असे नाही. मधुमेह आणि क्षयरोग  असणाऱ्या रुग्णांसाठी ही थेरपी प्रभावी ठरत नाही. प्लाझ्मा थेरपी कोविड-19 चा यशस्वी मुकाबला केलेल्या व्यक्तीकडून घेतलेल्या प्लाझ्माद्वारे रुग्णाची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी वापरली जाते त्यामुळे हा कोणताही उपचार नसून एक ‘रोगप्रतिकार समर्थन प्रणाली’ आहे असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

कोविड-19 या आजाराचा यशस्वी मुकाबला करण्यासाठी अजून तरी त्याची लस तयार झाली नाही. तरीसुद्धा या आजाराशी दोन हात करण्यासाठी जगभरातील वैद्यकीय संस्था परिश्रम घेत आहेत. प्लाझ्मा थेरपीमुळे जगभरात कोरोनाचे बरेच रुग्ण बरे झाल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे ‘प्लाझ्मा थेरपी’  एक पर्यायी उपाय म्हणून समोर येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.